काँग्रेसने आपसातच लढण्यापेक्षा ‘भाजप’वर सर्जिकल स्ट्राईक करावा – कपिल सिब्बल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसमध्ये सुरू झालेले वादळ काही केल्या शांत होताना दिसत नाही. नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केला म्हणून आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करणाऱयांविरोधात ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल चांगलेच आक्रमक झाले आहेत. कॉँग्रेसने आपसातच लढण्यापेक्षा ‘भाजप’वर सर्जिकल स्ट्राईक करावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

देशपातळीवर कॉँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष देण्यात यावा व गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी करणाऱया पत्रावरून कॉँग्रेसमध्ये एकच वादळ उठले आहे. या पत्रावर स्वाक्षरी केली म्हणून माजी मंत्री जितीन प्रसाद यांना काँग्रेसकडून उत्तर प्रदेशात अधिकृतपणे लक्ष्य केलं जात असल्याबद्दल कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रसाद यांच्या विरुद्ध उत्तर प्रदेशात मंजूर करण्यात आलेला ठराव ही दुर्दैवाची बाब असल्याचे सिब्बल यांनी ट्विट करत म्हटले आहे. आपल्याच पक्षाच्या नेत्यांविरोधात लढण्यात ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा भाजप विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्याची गरज असल्याचे खडे बोलही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सुनावले आहेत. सिब्बल यांच्या म्हणण्याच समर्थन करत कॉँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी ‘भविष्य ज्ञानी’ अस सूचक ट्विट केल आहे.

माजी मंत्री प्रसाद यांच्याविरुद्ध शिस्तभंगाचा प्रस्ताव
पक्ष नेतृत्वाबाबत पत्र लिहलं म्हणून काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितीन प्रसाद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्तावक उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हा काँग्रेसनं मंजूर केला आहे. तसेच प्रसाद कुटुंबीय हे पुर्वीपासून काँग्रेसविरोधी भूमिका घेतल आले असून जितीन यांचे वडील जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती याची आठवण करून देत जिल्हा काँग्रेसने प्रसाद यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे.