राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे आज ऑनलाइन वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे आज वितरण होणार आहे. खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य, ध्यानचंद या पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंना यावेळी गौरवण्यात येणार आहे. मात्र कोरोनामुळे या वर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण व्हर्च्युअली म्हणजेच ऑनलाइन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवन व देशातील विविध साई केंद्रे जोडली जाणार असून त्यानुसार खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर करण्यात येणार आहे. कोरोना, क्वारंटाइन कालावधी, आजारी व स्पर्धांसाठी परदेशवारी अशा विविध कारणांमुळे काही खेळाडूंची या कार्यक्रमाला अनुपस्थिती असणार आहे.

दोन दिवस रंगीत तालीम
ऑनलाइन पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज होणार आहे, पण त्याआधी त्याची रंगीत तालीम गुरुवार व शुक्रवारी करण्यात आली, जेणेकरून प्रत्यक्ष ज्या दिवशी हा कार्यक्रम पार पडेल त्या दिवशी सर्व काही व्यवस्थित होईल.

पुरस्कार मिळवणाऱया महाराष्ट्राच्या खेळाडूंची यादी
रोहित शर्मा, चिराग शेट्टी, अजय सावंत, सारिका काळे, दत्तू भोकनळ, सुयश जाधव, मधुरिका पाटकर, राहुल आवारे, प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे, नंदन बाळ.

रोहित, इशांत, अदिती, सुखविंदर परदेशात
साईकडून माहिती देण्यात आली आहे की, 74पैकी 65 जणांनाच या कार्यक्रमादरम्यान गौरवण्यात येणार आहे. कोरोना, क्वारंटाइन कालावधी, आजारी व स्पर्धांसाठी परदेशवारी अशा विविध कारणांमुळे नऊ खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत. यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, इशांत शर्मा, गोल्फपटू अदिती अशोक व फुटबॉलपटू सुखविंदर सिंग यांचा समावेश आहे. रोहित शर्मा व इशांत शर्मा आयपीएलसाठी दुबईला, अदिती अशोक अटलांटाला आणि सुखविंदर सिंग कॅनडाला आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तीन खेळाडूंचा सहभाग नाही
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विविध गटांसाठी 74 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यास सांगण्यात आले. या टेस्टनंतर तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यामध्ये बॅडमिंटनपटू सात्त्विक रेड्डीचाही समावेश होता. त्यामुळे आता या तीन खेळाडूंना या ऑनलाइन पुरस्कार कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.