बेशिस्त चालकावर रडार स्पीड मशीनची नजर, एकाच वेळी 32 वाहनांवर नजर ठेवता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
e-chalan-traffic-police

मंगेश सौंदाळकर

राज्यात अति वेगाने वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहन चालकावर रडार स्पीड मशीनच्या माध्यमातून पोलीस नजर ठेवणार आहेत. या मशीनच्या माध्यमातून एकाच वेळी 32 वाहनांवर सहज नजर ठेवता येईल. लवकरच 155 रडार स्पीड मशीन राज्यातील पोलिसांच्या ताफ्यात असणार आहेत.

बेशिस्त चालकामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिस रस्ते सुरक्षा निधीतून 13.95 कोटी रुपये खर्च करून 155 रडार स्पीड मशीन खरेदी करणार आहेत. या स्पीड रडार मशीनचा वापर राज्य, राष्ट्रीय महामार्गावर केला जाईल. सध्या महामार्ग पोलिसांकडे लेझर गन आहेत. पण त्यात एका वेळी एकाच मार्गिकेवर जाणारी वाहन टिपली जायची. पण या रडार स्पीड मशीनच्या माध्यमातून दोन-तीन मार्गिकावर एकाच वेळी 32 वाहनांवर सहज नजर ठेवता येणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. महामार्गाची भौगोलिक आणि रस्त्याची रचना ही अपघातांना कारणीभूत ठरते. त्यातच ओव्हरटेकिंग, लेन कटिंग, अति वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होतात.

  • राज्यात 3 कोटी 29 हजार वाहनांची नोंद, रोज महामार्गाकरून 15 लाख वाहनांची ये-जा सुरु
  • गेल्या वर्षी राज्यात अति वेगाने वाहन चालवल्याने 7 हजार 529 गंभीर अपघातात 8 हजार 175 जणांचा मृत्यू.
  • चुकीच्या दिशेने वाहन चालवल्याने 135, दारू पिऊन 48, मोबाईलवर बोलताना 11 आणि लाल सिग्नलवर न थांबल्याने 4 गंभीर अपघाताची नोंद

पुरावा म्हणून उपयुक्त ठरेल

रडार स्पीड मशीन माध्यमातून वाहनाचा फोटो, नंबर प्लेट, वाहनाची गती सहज टिपता येणार आहे. तसेच कोणत्या जागेवर वाहनाने वेग मर्यादेचे उल्लघन केले माहिती मिळणार आहेत. ते पुरावा म्हणून उपयुक्त ठरेल. त्यामुळे कारवाईकरून पोलीस आणि चालकाचे वाद कमी होतील.

वेगाने वाहन चालविल्याने होणारे अपघात रोखण्यासाठी रडार स्पीड मशीन हे उपयुक्त ठरेल. एकाच वेळी 32 काहनांवर नजर ठेवणार आहेत. लवकरच रडार स्पीड मशीन पोलिसांना दिल्या जाणार आहेत. विजय पाटील, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) महामार्ग पोलीस