
मुळस हेवाळे पूल (कॉजवे) अखेर वाहून गेला. पुलावरील पाणी ओसरल्यावर ते लक्षात आले. पुलाचा जवळपास अर्धाअधिक भाग पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर नाहीसा झाला. काही दिवसांपुर्वी पुलाचा कोसळलेला भाग तात्पुरता दुरुस्त करण्यात आला होता; मात्र ती मलमपट्टीही कुचकामी ठरली. पुलाअभावी गावकऱयांना गावात जाण्यासाठी रामेश्वराचा फेरा मारावा लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांचा लढय़ाचा इतिहास असलेला हा पूल आहे.
तिलारी पाटबंधारे प्रकल्पाने खरारी नदीवर मुळस हेवाळे जोडणारा कॉजवे बांधून लोकांच्या येण्याजाण्याची व्यवस्था केली होती. पूल कमी उंचीचा आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. म्हशीही वाहून गेल्या. त्यामुळे नव्या अधिक उंचीच्या पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यासाठी जयवंतराव देसाई, झुजे लोबो आणि स्थानिक ग्रामस्थांनी पुलासाठी चळवळ उभी केली होती. तत्कालिन आमदार शिवराम दळवी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी पुलाचे आश्वासन दिले. नाबार्डमधून पुलासाठी निधी मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र त्यातील एक रुपयाही पुलासाठी मिळालेला नाही. साहजिकच त्या पुलाने पाण्याच्या वेगवान प्रवाहासमोर तग धरला नाही आणि तो अर्ध्याहून अधिक वाहून गेला. दरम्यान, तिलारी यांत्रिकी विभाग आणि गावकऱयांनी नदीतील गोटे वाहून गेलेल्या भागात पसरवून दोन्ही भाग जोडून तात्पुरती वाहतूक सुरू केली आहे. अर्थात पुन्हा पाण्याची पातळी वाढल्यास ती डागडुजीही कुचकामी ठरणार आहे.





















































