
नाशिकमधून देशातील पहिली किसान रेल्वे सुरू झाली असून, शेतकऱ्य़ांच्या हितासाठी नोडल एजन्सी म्हणून नाफेडची नियुक्ती करावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे. याबाबत केंद्र सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती गोडसे यांनी दिली.
शेतमाल विक्रीतून जास्तीत जास्त फायदा हा शेतकऱ्य़ांना मिळावा, या खरेदी-विक्रीत पारदर्शकता यावी, म्हणून किसान रेल्वेत व्यापाऱ्य़ांच्या एजंटऐवजी नोडल एजन्सी म्हणून नाफेडची नियुक्ती करावी, या मागणीसाठी खासदार गोडसे यांनी नुकतीच केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेवून चर्चा केली. नाफेडमुळे ग्राहक ते शेतकरी असा थेट शेतमाल विक्रीसाठी संपर्क होईल, परराज्यातील बाजारभावाची रक्कम थेट शेतकऱ्य़ांना मिळेल, असे गोडसे यावेळी म्हणाले. नाफेडला नोडल एजन्सी म्हणून नेमण्याबाबत कृषीमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे, असे गोडसे यांनी सांगितले.
नाशिकजवळील देवळाली स्थानकावरून 7 ऑगस्टला देशातील पहिल्या किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. मागील आठवड्यात ही रेल्वे आठवड्यातून दोनदा सुरू करण्यास मंजुरी मिळाली.शेतकऱ्य़ांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून आठवड्यातून तीनवेळा ही रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही गोडसे यांनी यावेळी केली.


























































