नागपूरसह विदर्भाला पुराचा वेढा; अनेक गावे पाण्याखाली, काहींचा संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन दिवसांपासून नागपूर आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे येथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या पावसामुळे नागपूरसह विदर्भाला पुराचा वेढा घातला असून अनेक ठिकाणी गावे पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या संपर्क तुटला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे येथील अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्याने रस्त्यांवर देखील पाणी साचले असून महामार्ग देखील पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, बचावकार्यासाठी एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्यासेवेसह लष्कराचे पथक बचावकार्य करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात गुरूवारी रात्री पासून सुरू असलेला पाऊस शनिवारी दूपारपर्यंतही कायम असल्यामुळे सर्वच धरणांचा जलसाठा वाढला असल्याने सर्वात मोठया अप्पर वर्धा धरणासह सहा धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. अप्पर वर्धा धरणाचे संपूर्ण 13 दरवाजे दोन मिटरने शुक्रवारी संध्याकाळ पासून उघडे आहे.

20 गावांना पुराने वेढले

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोबतच मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील 20 गावांना पुराने वेढा घातला असून 1994 नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बचावकार्यासाठी 26 जणांची तीन पथके पाठवण्यात आली असल्याचे तहसीलदार प्रशांत घोरूडे यांनी सांगितले.

शेतकऱ्य़ांचे प्रचंड नुकसान

वैनगंगा नदीला पाणी झपाट्याने वाढत असल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) गावात पाणी शिरले आहे. तर आवळगाव येथेही पुलावर पाणी वाहत आहे. त्यामुळे गांगलवाडी ते मुडझा मार्ग बंद झाला. या परिसरातील भाजीपाला व धान शेतीही पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतकऱ्य़ांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.