Eng vs Aus – 39 चेंडूत 40 धावा अन हातात 9 विकेट्स, तरीही बलाढ्य ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात साऊथहंप्टन मैदानात रोमहर्षक सामना रंगला. पहिल्याच टी-20 लढतीत यजमान संघाने ऑस्ट्रेलियाचा 2 धावांनी पराभव करत मालिकेत आघाडी घेतली. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 163 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही आणि त्यांचा संघ 6 बाद 160 धावा करू शकला. इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान याला अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार मिळाला.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने डेव्हिड मलान (66) आणि बेअरस्टो (44) यांच्या फलंदाजीचा जोरावर 20 षटकात 7 बाद 162 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून एश्टन एगर, रिचर्डसन आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला वॉर्नर आणि फिंच यांनी 98 धावांची सलामी दिली. 11 षटकात फिंच 46 धावांवर बाद झाला. फिंचनंतर मैदानात आलेल्या स्मिथने वॉर्नरसोबत खेळताना 14.2 षटकात संघाची धावसंख्या 1 बाद 124 वर पोहोचवली. याच धावसंख्येवर स्मिथ 18 धावा काढून बाद झाला.

https://twitter.com/ICC/status/1301981668035657730?s=19

स्मिथ मैदानावर होता तेव्हा चेंडू आणि आवश्यक धावा बरोबरीत आल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला 39 चेंडूत 40 धावा हव्या होत्या आणि त्यांच्या हातात 9 विकेट्स होत्या. मात्र स्मिथ बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. वॉर्नर, मॅक्सवेल एका पाठोपाठ बाद झाले. अखेरच्या षटकात 15 धावा हव्या असताना ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 13 धावा करू शकला आणि सामना गमावला. इंग्लंड कडून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.