
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक व प्रशिक्षक प्रा. वामन केंद्रे हे नवनवीन व कल्पक प्रयोग करण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. कोरोना महामारीच्या काळात सहा महिन्यांपासून सगळे सांस्कृतिक उपक्रम बंद आहेत. घरात राहूनही आपला वेळ सत्कारणी लागावा व अशा वेळेचा सदुपयोग अनोखे शिक्षण-प्रशिक्षण घेऊन भविष्य समृद्ध करण्यासाठी करता यावा म्हणून प्रा. केंद्रे यांच्या आगळ्या-वेगळ्या तीन महिने ऑनलाइन चालणाऱया ‘आवाज व संभाषण’ या कार्यशाळेचे आयोजन 19 सप्टेंबर ते 19 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रत्येक शनिवार व रविवार सांयकाळी 6 ते 8 या वेळेत करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत आवाज म्हणजे काय, त्याची जोपासना प्रक्रिया, आवाजाची वैशिष्टय़े कोणती, आवाजनिर्मितीची प्रक्रिया काय आहे? आवाज साधना कशी करायची? श्रवणीयता आणि आवाज, आवाज आणि श्वास यांचे काय नाते आहे? श्वासाचे व्यवस्थापन, श्वसन संस्थेचा अभ्यास, रेझोनेटर्सचा अभ्यास, आवाजातील गुंजन, घुमारेदारपणा व प्रतिध्वनी क्षमता याचा विकास कसा करावा? संभाषण म्हणजे काय? संभाषण उत्कृष्ट करण्यासाठी काय करावे लागते? अक्षरांचा अभ्यास व त्यांचे योग्य उच्चारण, उच्चारणदोष मुक्ती, उच्चारण आणि उच्चारशास्त्र, संवादफेक म्हणजे काय व ती कशी करायची? पॉज, आघात, वजन, शब्द उछाल, आकार याचा वापर बोलण्यात कसा करायचा? टेक्स्ट व सबटेक्स्ट याचा अभ्यास आणि भावना प्रकटीकरण व अर्थ प्रकटीकरण, रेकॉर्डिंग व डबिंग टेक्निक्स, संवाद साधण्याची कला व त्याचे मूळ सूत्र, निवेदनाची तंत्र-मंत्र कोणती? बोलण्यातले संगीत, भाषा व बोली भाषांची शक्ती या सर्व विषयांवर प्रात्यक्षिकांसहित प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ही कार्यशाळा रंगपीठ थिएटर व मावा क्रिएशन्स मुंबई या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येत असून या कार्यशाळेत 16 वर्षांपुढील अभिनेते, नेते वक्ते, सूत्रसंचालक, निवेदक, कथाकथन व निरूपण करणारे कलाकार, गायक, शिक्षक, डबिंग कलाकार, रेडिओ कलाकार, वकील, आवाजाद्वारे भविष्य घडवू इच्छिणाऱया व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यशाळेत मोजक्याच जागा असून प्रवेश इच्छुकांनी 9820868628 वर संपर्क साधावा.























































