आरेचे दूध वितरण न वाढल्यास वाहतूक बंद करणार, महाराष्ट्र दूध वितरक सेनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरेचे दूध वितरण कमालीचे घटले असून दूध विक्री कमिशनमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे वितरक आणि दूध वाहतुकदारांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत दुधाचे वितरण वाढवण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार दुधाचे वितरण न वाढल्यास दुधाची वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी दिला आहे.

महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्या शिष्टमंडळाने मार्च महिन्यात दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांची भेट घेतली होती. तेव्हा आरे दूध वितरकांच्या विक्री कमिशन वाढीबरोबरच अन्य समस्या तत्काळ सोडवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. त्यातच कोरोना महामारीच्या संकट काळात शासकीय संस्था, रुग्णालयाचा दूध पुरवठा कमी झाला आहे. तसेच दुधाची विक्री घटल्याने आणि पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाल्याने वाहतुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही दुग्ध व्यवसाय विभागाकडून सकारात्मक निर्णय झालेला नाही.

त्या पार्श्वभूमीवर आरे वितरकांचे दूध विक्री कमिशन वाढ आणि दूध वाहतूक दराबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास दूध वाहतूक व्यवस्था बंद करावी लागेल असे महाराष्ट्र दूध वितरक सेनेने बजावले होते. त्याची दखल घेत आरे महाव्यवस्थापकांनी संघटनेचे पदाधिकारी व वाहतूकदार यांची बैठक घेऊन दूध वितरण वाढीबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार दुधाचे वितरण न वाढल्यास दुधाची वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा इशारा राम कदम यांनी दिला आहे. यावेळी महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे विलास भुजबळ, सुनील घाडी आदी उपस्थित होते.