
लॉकडाऊनने कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवला, मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड मोठे नुकसान केले. लॉकडाऊनची योग्यरित्या अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे चालू आर्थिक कर्षात अर्थव्यवस्थेला तब्बल 20 लाख कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे, असा अंदाज माजी केंद्रीय अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी रविवारी वर्तवला. देशाची आर्थिक स्थिती चौथ्या तिमाहीत रुळावर येईल, तोपर्यंत जीडीपीमध्ये 10 ते 11 टक्क्यांची घट होईल, असे ते म्हणाले.
जीडीपीतील घसरणीबाबत गर्ग यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. जीडीपीमध्ये पहिल्या तिमाहीतील 23.9 टक्क्यांच्या घसरणीसह दुसऱ्या तिमाहीत 12 ते 15 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 4 ते 5 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. लॉकडाऊनमुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मोठा झटका बसला आहे. देशभरात एकूण 7 कोटी 5 लाखांच्या आसपास सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. कोरोना महामारीत कोलमडून गेलेल्या या उद्योगांना सावरण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने ’आत्मनिर्भर भारत’ पॅकेजअंतर्गत ज्या योजना सादर केल्या आहेत, त्या योजनांचा केवळ 40 ते 50 लाख उद्योगांना लाभ मिळत आहे, असा दावाही गर्ग यांनी याकेळी केला.


























































