
मुंबईत सोमवार, 5 ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट, बार सुरू होणार असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेल उद्योगाचे ‘अर्थचक्र’ फिरू लागणार आहे. मुंबईत 33 टक्के तर राज्यात 50 टक्के क्षमतेने बार, रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन-अनलॉक-5’ अंतर्गत हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हे उद्योग सुरू होणार असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक राहणार आहे.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे गेल्या सहा महिन्यांपासून बार-रेस्टॉरंट बंद आहेत. कोरोना रोखण्यासाठी बार-रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या उद्योगावर अवलंबून असणारे लाखो कामगार बेरोजगार आहेत. यामुळे राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत आवश्यक खबरदारी घेऊन रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकार आणि हॉटेल, बार, रेस्टॉरंट संघटना यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात हॉटेल, रेस्टॉरंट मालक-चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांनंतर व्यवसाय सुरू होणार असल्याने जागेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
‘ऑनलाइन’ बुकिंगला प्राधान्य द्या!
कोरोना नियंत्रणात आला असला तरी संकट टळलेले नाही. तरीही हॉटेल व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन, गर्दी टाळण्यासाठी शक्यतो ऑनलाइन बुकिंगवर भर द्यावा. जेणेकरून नियमांचे पालनही होईल आणि जेवणाचा आस्वाद घेता येईल असे आवाहन पालिकेने केले आहे.
हे मात्र बंदच राहणार
कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यातील शाळा, कॉलेज, सिनेमागृह, स्वीमिंग पूल, थिएटर, मेट्रो सेवा मात्र तूर्तास बंदच राहणार आहे.
सोमवारपासून हे सुरू होणार
राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट 50 टक्के ग्राहक क्षमतेने सुरू होतील. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 33 टक्के उपस्थितीत या सेवा देता येतील. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व इंडस्ट्रीअल आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू होणार.
…तर परवाना रद्द होणार!
मुंबईत रेस्टॉरंट, बार 33 टक्के क्षमतेवर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, तीन फुटांचे अंतर ठेवणे, वेळोवेळी जागेचे निर्जंतुकीकरण करणे, क्रिनिंग करणे अशा व्यवस्था ठेवणे बंधनकारक राहणार आहे. हे नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांचा परवाना रद्द करणे, दंड वसूल करणे अशी कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. बार, रेस्टॉरंट चालकांकडून नियमांचे पालन होते की नाही यावर नजर ठेवण्यासाठी विभागवार पालिकेची पथके लक्ष ठेवणार आहेत. ही पथके कोणत्याही वेळी व्हिजिट करणार असून नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही काकाणी म्हणाले.
बारमधील मार्गदर्शक सूचना
– बर्फाचे ट्रे आणि कंटेनर स्वच्छ धुतलेले आणि निर्जंतुकीरण आवश्यक
– मद्याच्या बाटल्या, वाईन व बीयरच्या बाटल्यांचे निर्जंतुकीकरण
– मद्याचे ग्लास गरम पाणी आणि लिंबाने धुणे आवश्यक
– शारीरिक अंतर राखणे आवश्यक
– हात पुसण्यासाठी चांगल्या दर्जाचे पेपर नॅपकिन
– प्लेट, वाटय़ा, ग्लास गरम पाण्याने साफ करणे आवश्यक
हॉटेल प्रवेशाबाबतच्या सूचना
– हॉटेलमध्ये येणाऱया प्रत्येकाच्या शरीराचे तापमान थर्मल गनने तपासणे
– शरीराचे तापमान 38 अंश से. पेक्षा अधिक आणि तापाची लक्षणे आढळल्यास प्रवेश नाही
– मास्कशिवाय प्रवेश नाही
– हॅण्ड सॅनिटायझर आवश्यक
– बुफे पद्धतीच्या जेवणाला परवानगी नाही
– गाण्यांच्या-मनोरंजनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाही
– बिलियर्ड-टार्डला परवानगी नाही
– क्लबमध्ये पत्ते खेळण्यास मुभा नाही
– दिवसातून दोनदा हॉटेलचे निर्जंतुकीकरण आवश्यक























































