क्वितोवा, सिगमंडची उपांत्यपूर्व फेरीत धडक, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवा आणि जर्मनीची लॉरा सिगमंड या महिला टेनिसपटूंनी सोमवारी फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅममध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

पेत्रा क्वितोवा हिने चीनच्या झँग शुई हिच्यावर 6-2, 6-4 अशा फरकाने सहज विजय मिळवला आणि अंतिम आठमध्ये प्रवेश केला. गेल्या आठ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पेत्रा क्वितोवा हिला फ्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठता आलेली आहे. तसेच सलग चौथ्या सामन्यात सरळ दोन सेटमध्येही तिला विजय मिळवता आला आहे. 30 वर्षीय या खेळाडूला 2012 सालामध्ये या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली होती. फ्रेंच ओपन स्पर्धेतील ही तिची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.

बिनसीडेड अन् 66वे जागतिक रँकिंग

जर्मनीची लॉरा सीगमंड हिला या स्पर्धेत सीडींग मिळालेले नव्हते. तसेच जागतिक क्रमवारीत तिचे रँकिंग 66वे आहे. पण तरीही या अनुभवी टेनिसपटूने फ्रेंच ओपन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. लॉरा सीगमंड हिने स्पेनच्या पॉला बडोसा हिला 7-5, 6-2 अशा फरकाने पराभूत केले आणि महिला एकेरीत आगेकूच केली.