
कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग पाळतानाच कार्यालयापासून ते अगदी घरातदेखील दरवाजाच्या हॅण्डलला पुणाचे हात लागताहेत का याकडे आपले काटेकोरपणे लक्ष असते. हात लागताच तो हॅण्डल, इलेक्ट्रिकची बटने निर्जंतुक करण्यासाठी आपण धडपडत होतो… मात्र सततच्या या टेन्शनमधून आता आपली सुटका झाली आहे. दरवाजाचे हॅण्डल किंवा बटनांमधून कोरोनाचा फैलाव होत नाही असा दावा कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. पृष्ठभागावर असलेल्या विषाणूंमध्ये एखाद्या व्यक्तीला संसर्गबाधित करण्याची क्षमता नसल्याचे या संशोधनात सहभागी प्राध्यापक डॉ. मोनिका गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
जगात 10 जणांमध्ये एकाला कोरोना
कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण इतके वाढले आहे की जगातील 10 जणांमागे एकाला कोरोना झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) केला आहे. डब्लूएचओचे सदस्य मायकल रायन यांनी ही माहिती दिली आहे. ग्रामीण-शहरी, तसेच विविध वयोगटांनुसार कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण बदलत असले तरी जगाच्या मोठय़ा लोकसंख्येला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. जगाच्या 7.6 अब्ज लोकसंख्येपैकी 76 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज डब्लूएचओने वर्तवला आहे.
























































