पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ 97 वर, नवनिर्वाचित नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेचे संख्याबळ आता 97 झाले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शिवसेनेचे शंकर हुंडारे आणि संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून अलीकडेच घोषणा करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे.

पालिकेच्या 2017च्या निवडणुकीत एकूण पाच नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले होते. त्यापैकी कांदिवली प्रभाग क्र. 28 मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्याच्या निर्णयावर लघुवाद न्यायालय, सर्वाेच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. यामुळे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमाकांची मते मिळवणारे शिवसेना उमेदवार शंकर हुंडारे यांचा नगरसेवक होण्याचा मार्ग मोकळा झाला. तर अंधेरी येथील प्रभाग क्रमांक 81 चे भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांचेही नगरसेवक पद बाद झाले होते. या प्रकरणी लघुवाद न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते. त्यामुळे दुसऱ्या क्रमाकांची मते मिळवणारे शिवसेनेचे संदीप नाईक यांना नगरसेवक घोषित करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला होते.