
भुदरगड तालुक्यात दुचाकी चोरणाऱया दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे पाच लाख 30 हजार रुपयांच्या 15 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अवधूत लहू धुरे (वय 20, रा. फये) आणि तुलसीदास अर्जुन पाटील (वय 21 रा. भेंडवडे, दोघे ता. भुदरगड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर जिह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने चोरटय़ांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले होते. अवधूत धुरे व तुलसीदास पाटील या दोन सराईत दुचाकीचोरांबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पाच लाख 30 हजार रुपये किमतीच्या 15 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. अवधूत धुरे हा चोरलेल्या दुचाकी तुलसीदासकडे विकण्यासाठी देत असल्याची कबुली या दोघांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पोवार, सत्यराज घुले, पांडुरंग पाटील, तुकाराम राजगिरे, विठ्ठल मणिकेरी, रणजित कांबळे, नामदेव यादव यांनी ही कारवाई केली.



























































