
कोरोना संकटाच्या काळात जवळजवळ प्रत्येक नागरिकावर काही ना काही मानसिक आणि भावनिक परिणाम झाला आहे. परीक्षा, अॅडमिशन यांना झालेल्या विलंबामुळे विद्यार्थी वर्गालाही त्याचा सामना करावा लागला. आता लवकरच महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी पवई येथील आयआयटी मुंबई ‘बंधू’ ही वेबसाईट सुरू करत आहे.
‘बंधू’ या वेबसाईटवर विविध कोडी, कथा आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या वेबसाईटचा वापर करून आपला ताण कमी करावा असे आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. सुभाशिष चौधरी यांनी सांगितले.
आयआयटी मुंबईच्या 1992 च्या बॅचने दिलेल्या निधीतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोना संकटामुळे शैक्षणिक व इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव वाढला आहे. भावनिकदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तर त्याची तीव्रता अधिकच आहे. आपला हा ‘बंधू’ विद्यार्थ्यांचा तो ताणतणाव निश्चितच दूर करण्यात मदत करेल असा विश्वास डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
विमानाशिवाय उडता येणाऱ्या जेट-सूटचेही उद्घाटन
‘बंधू’ हा आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टचाच एक भाग असल्याने या वेबसाईटच्या शुभारंभप्रसंगी ‘स्पेसफ्लाईट’ हा एक विशेष जेट-सूटही दाखवला जाणार आहे. विमानाशिवाय पायलट हा सूट घालून उडू शकणार आहे. त्याचे उद्घाटन रिचर्ड ब्राऊनिंग यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जगातील असा पहिला जेट-सूट बनवण्याचे पेटंट ब्राऊनिंग यांच्याकडे आहे. या सूटचा वेग ताशी 130 किलोमीटर आहे आणि सूट परिधान करून जमिनीपासून 12 हजार फूट उंचीपर्यंत उडता येऊ शकते.


























































