
पुणे शहरातील विविध भागातून वाहने चोरणाऱ्या सराईताला अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
रवींद्र राया इंदुलकर (वय 31, रा. कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अलंकार पोलीस वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी राजेंद्र लांडगे व निलेश शिर्के यांना सराईत वाहनचोर रवींद्रची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी रवींद्रला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूली दिली. त्याने विविध भागातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांच्या 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सयाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सहायक पोलीस उपनिरीक्षक तन्वीर शेख, निलेश शिर्के, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, किरण राऊत, हरी गायकवाड यांच्या पथकाने केली.


























































