दुचाकींची बेकायदा पार्किंग बंद करा, रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत शिस्तबद्ध वाहतुकीसाठी आणि वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी दुचाकीच्या बेकायदेशीर पार्किंगवर कडक कारवाई करावी असे निर्देश रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांनी वाहतूक विभागाला दिले.

तर मुंबईच्या वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी मुख्य रस्ते आठवडय़ातून एक दिवस केवळ फक्त सायकल चालवणाऱ्य़ांसाठी आरक्षित करावेत असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिले.

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांसंदर्भात आज महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत यांच्यासह वाहतूक विभाग आणि रस्ता  सुरक्षा समिती सदस्यांची बैठक ओल्ड कस्टम हाऊस येथे पार पडली. यावेळी आमदार यामिनी जाधव, अजय चौधरी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत रस्ते एकतर्फी करताना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार यावेळी लोकप्रतिनिधींनी केली. शिवाय पुलांचे काम करताना पालिकेने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्यास वाहतुकीचे नियोजन करणे सोयीस्कर होईल असे मत मांडले.

तर दारूखानासारख्या ठिकाणी असणाऱ्य़ा बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी दिले. मुंबईत दररोज किती गाडय़ा येतात याची सविस्तर माहिती द्यावी आणि सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना याबाबत माहिती देण्याचे निर्देशही सावंत यांनी दिले.

पालिकेने मोफत पार्किंग उपलब्ध करून दिले असताना वाहनचालक बेकायदेशीपरणे आपल्या गाडय़ा पार्प करीत असल्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे महापौर पेडणेकर म्हणाल्या. पालिका आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम राबवाही असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.