‘टीम इंडिया’च्या बायो-बबलमध्ये विराट कोहली, आयपीएलमधील आव्हान संपलेल्या खेळाडूंचा सराव सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे ‘आयपीएल’मधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली आता ‘टीम इंडिया’च्या बायो-बबलमध्ये दाखल झाला आहे. एक-दोन दिवसांत तो आपल्या सरावास प्रारंभ करणार आहे. ‘आयपीएल’ संपल्यानंतर पुढील आठवडय़ात हिंदुस्थानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी रवाना होणार आहे.

एकदिवसीय मालिकेने होणार प्रारंभ
हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर 3 एकदिवसीय, 3 टी-20 आणि 4 कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेने 27 नोव्हेंबरपासून या द्विपक्षीय मालिकेस प्रारंभ होणार आहे. पहिला टी-20 सामना 4 डिसेंबरला कॅनबेरामध्ये खेळला जाईल, तर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे.

‘टीम इंडिया’ सिडनीत दाखल होणार
‘आयपीएल’ संपल्यानंतर ‘टीम इंडिया’ आणि टी-20 लीगमध्ये खेळत असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू सिडनीमध्ये दाखल होतील. तेथेच या सर्वांना 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यानंतर हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियन संघ सरावास प्रारंभ करतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागील आठवडय़ातच न्यू साऊथ वेल्स सरकारशी करार केला आहे. या करारामुळे क्वारंटाइन खेळाडू सिडनी व कॅनबेरा येथे सराव करणार आहेत.

मयांक, पुजाराचा गुलाबी चेंडूवर सराव
‘आयपीएल’मधील आव्हान संपुष्टात आलेल्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया दौऱयाच्या पार्श्वभूमीवर सरावास प्रारंभ केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा मयांक अग्रवालसह चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी असे अनेक खेळाडू बायो-बबलमध्ये सराव करत आहेत. ऍडलेडमध्ये होणाऱया दिवस-रात्र कसोटीसाठी मयांक आणि पुजारा यांनी गुलाबी चेंडूवरही सराव सुरू केला आहे.