कृष्णामाईशी संवाद साधे श्री वासुदेव दत्त रूप…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निलकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील दोन्ही अवतारांनी कृष्णानदीविषयी आपुलकी प्रकट केली आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचे प्रकट वास्तव बहुवंशी कृष्णेची नाभी समजल्या गेलेल्या कुरुगड्डीत व्यतीत झाले आहे. तसेच श्री नृसिंहसरस्वती स्वामींची प्रमुख लीलास्थाने नरसोबाचीवाडी तसेच गाणगापूर कृष्णेकाठीच आहेत अर्थात श्री स्वामी महाराजांना कृष्णामाईन विषयी विशेष आत्मीयता व आदर होता. वाडीच्या पुजाऱ्याचा बरीच वर्षे महाराजांनी जगन्नाथपंडितांच्या गंगालहरी प्रमाणे एक कृष्णालहरी करावी असा आग्रह होता.

पुढे इ.स 1905 च्या वाडीच्या वास्तवव्य नंतर महाराज गाणगापूरला जाताना महाराजांना श्रीकृष्णामाईने साक्षात दर्शन देऊन कृष्णालहरी करण्याबद्दल आज्ञा दिली. त्या वेळी अत्यंत उस्फुर्तपणे एका मागोमाग एक असे जलदपणे 51 श्लोक महाराजांच्या मुखातून बाहेर पडले तेव्हा ‘पुरे’ म्हणून कृष्णा माता अंतर्धान पावली. श्री कृष्णामातेच्या व महाराजांच्या हार्दिक अनुबंधाचे एक उदाहरण तंजावरच्या इ.स 1907 चातुर्मासानंतर महाराज कृष्णातीराने संचार करता असता घडेल. फाल्गुन शु ।। 14 ला महाराज एका छोट्या गावात येऊन पोहोचले दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असल्याने मुक्कामाला जागा पहावी व क्षौराची काही सोय होते का पहावे, या हेतूने गावकऱ्यांन जवळ चौकशी केली. त्यांनी काही व्यवस्था करणे तर दूरच पण महाराजांनाच उलटसुलट प्रश्न विचारून त्यांची मस्करीच आरंभली. ह्या सर्व प्रकाराने त्रस्त होऊन गावाबाहेर एका झाडाखाली जाऊन बसले. त्यांनी शेवटी कृष्णामाईशी मानसिक संवाद सुरू केला.

माते! आपल्याविषयी आम्ही इतका अभिमान बाळगत असता आपणास या शरुराचा काहीच अभिमान नाही काय? उद्या या गावात जर क्षौराची तजवीज झाली नाही, तर यापुढे वज्जीव आपण क्षौर करणार नाही व दंडत्याग करून इच्छेप्रमाणे आपण कोठेही फिरत राहू. आजपासून आपली आज्ञा पाळण्याचे काहीच कारण दिसत नाही. याचप्रमाणे कृष्णामातेशी प्रेम कलह करून महाराज तिथेच झोपले.

रात्री स्वप्नांत कृष्णामाईंनी दर्शन देऊन महाराजांना आश्वासन दिले की, आपल्याला आपणाविषयी पूर्ण अभिमान असून दुसरे दिवशी क्षौरविधीची व्यवस्था होईल. इकडे गावांतील मुख्य व्यक्तींना एकाच वेळी स्वप्नांत आपले उग्र स्वरूप दाखवून अशा महान तपस्वी संन्याशाचा छळ केल्याबद्दल कानउघडणी केली. दुसरे दिवशी त्यांची क्षमा मागून त्यांच्या क्षौराची व्यवस्था करून त्यांची कृपा संपादन न केली तर गावांत फार मोठे संकट येऊन सर्वांचा नाश होईल, असा इशारा दिला.

दुसरे दिवशी सर्व प्रमुख गावकऱ्यांनी हे स्वप्नं एकमेकांना सांगून कृष्णामाईच्या आज्ञेप्रमाणे महाराजांना शरण आले व त्यांची क्षमा मागून आपली सेवा घेण्याची प्रार्थना केली. क्षौराची उत्तम व्यवस्था तर झालीच पण पुढे महाराजांना आग्रहाने पंधरा दिवस ठेवून घेऊन त्यांची सेवा करून अपराधाचे परिमार्जन केले.

रथ सप्तमीपासून वाडीला कृष्णामाईचा उत्सव साजरा होतो शके 1831 (इ.स. 1909) च्या उत्सवाला महाराज वाडीत होते. त्या दिवशी कृष्णवेणीची मूर्ती वाजवतगाजवत दरवर्षीप्रमाणे देवाकडे आणताना महाराज पाठ सांगताना उठून बाहेर आले. मूर्तीकडे पाहताच महाराजांनी प्रेमाचे भरते येऊन अश्रुधारा सुरू झाल्या हातातले पुस्तक गळून पडले. कृष्णा लहरीचा पहिला श्लोक म्हणण्यास सुरुवात केली.