
>> नामदेव सदावर्ते
भगवंताची प्राप्ती होण्यासाठी लक्ष्मीसारखी श्रीमंती किंवा श्रीशंभूसारखी तपश्चर्या यांची आवश्यकता नाही. आपला मोठेपणा दूर ठेवून, विद्वत्तेचा अभिमान न बाळगता नम्रपणे लहान होऊन जगात वावरणे, असे केले तरच त्या भगवंताची प्राप्ती होते. कारण लक्ष्मीनेही अभिमान सोडून, देवाला सर्वस्व अर्पण करून देवाची सेवा केली तेव्हा भगवंताचे चरण धुण्याचे भाग्य तिला लाभले. अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लक्ष्मी देवीचे पूजन केले आहे. ज्ञानेश्वरीत भगवती, महिषासुरमर्दिनी जगदंबा, महालक्ष्मी माता, यांचे स्मरण करून ज्ञानराजांनी लक्ष्मीपूजन केले आहे.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत लक्ष्मीमातेचे स्मरण-पूजन केलेले आहे. भगवत्गीतेला ते जगदंबेची उपमा देतात. अर्जुनाचा मोह नष्ट करून त्याला युद्धप्रवृत्त करणारी गीता ही सप्तशती, मोहमहिषासुरमर्दिनी देवी आहे. अठरा अध्यायाची गीता ही अष्टादश-भूजा देवी आहे. गीता ही जशी देवीमाता आहे तशीच ती महालक्ष्मी मातासुद्धा आहे. गीता ही विचाररूपी क्षीरसागराचे मंथन करून त्यातून प्रकट झालेली ही नवी लक्ष्मीच आहे.
जे ज्ञानामृताची जान्हवी । जे आनंदचंद्रीची सतरावी ।
विचार क्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ।।
गीता ही ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे. आनंदरूपी चंद्राची ही सतरावी जीवनकला आहे. ही गीता आपल्या पदांनी ज्ञानाने आपले जीवन समृद्ध करणारी आहे.
आयुष्यभर आपल्या शरीरात ईश्वरी चैतन्य शक्तीरूपात असते. शरीरात ही प्राणशक्ती असते तोपर्यंतच जीव जिवंत असतो. दैवहीन पुरुषाचे घरी जशी लक्ष्मी थांबत नाही तसेच चेतनाहीन शरीरात चैतन्य वास करीत नाही.
जैसे गतायुषी शरीरी । चैतन्य वासु न करी ।
कां निदैवाच्या घरी । न राहे लक्ष्मी ।।
जो निक्रिय, दुबळा, निदैवी असतो त्याच्या घरी लक्ष्मी राहात नाही. पण दुबळ्या, दीन भक्ताच्या संसारात निर्धनता असूनही जर तो नामस्मरण भक्ती करीत समाधानी वृत्तीने राहणारा असेल तर तो भक्त भाग्यवान ठरतो.
पै निर्धना घरी वानिवसे । महालक्ष्मीचि येऊन बैसे ।
तयाते निर्धन ऐसे । म्हणो ये काई ।।
ज्याचे हृदयी सतत नाम-स्मरण-भक्ती असते तो श्रीमंतच असतो. धनऐश्वर्यसंपन्न लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोणी आहे काय? ज्या लक्ष्मीच्या घरी दासी आहेत, त्या दासींनी भातुकलीच्या खेळात केलेल्या घरकुलांना अमरावती असे नाव दिले तर इंद्रादिक त्या खेळातील बाहुल्याच ठरतील. खेळाचा कंटाळा आल्यावर त्या दासी जेव्हा खेळ मोडतात तेव्हा इंद्रासारखे देवही रंक होतात.
नातरी अथिलेपणे सरिसी । कवणी आहे लक्ष्मी ऐसी ।
स्त्र्ायेसारिखिया दासी । घरी जियेते ।।
जिच्या घरच्या दासींची एवढी शक्ती आहे त्या लक्ष्मी मातेचे ऐश्वर्य आणि श्रीशंभूच्या तपाचेही भगवंताच्या पुढे महत्त्व नाही.
तैसे लक्ष्मीयेचे थोरपण न सरे ।
जेथ शंभूचे तपही न पुरे।
तेथ येर प्राकृत हेंदरे ।
केवि जाणो लाहे ।।
भगवंताची प्राप्ती होण्यासाठी लक्ष्मीसारखी श्रीमंती किंवा श्रीशंभूसारखी तपश्चर्या यांची आवश्यकता नाही. आपला मोठेपणा दूर ठेवून, विद्वत्तेचा अभिमान न बाळगता नम्रपणे लहान होऊन जगात वावरणे, असे केले तरच त्या भगवंताची प्राप्ती होते. कारण लक्ष्मीनेही अभिमान सोडून, देवाला सर्वस्व अर्पण करून देवाची सेवा केली तेव्हा भगवंताचे चरण धुण्याचे भाग्य तिला लाभले.
मग सर्वस्वे करूनि सेवा । अभिमान सांडुनि पांडवा ।
जे पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहली ।।
जे भक्त आपले सर्वस्व भगवंताला अर्पण करून शरण जातात व त्यांची अनन्य भक्ती करतात. जो भगवंत वेदांना समजला नाही. भगवंतच स्वतःला यथार्थपणे जाणतो. आकाशाला स्वतःचा विस्तार माहीत नसतो. ज्ञानराज म्हणतात, हे लक्ष्मीपती देवा, तूच तुला जाणणारा आहेस. बाकी वेदादि जे आहेत ते फक्त तुझा मोठेपणा वर्णन करतात. त्यांनाही तुझे सामर्थ्य पूर्णपणे समजले नाही.
तैसा आपुलिये सर्व शक्ती । तुज तूचि जाणूं लक्ष्मीपती
येर वेदादिक मती । मिरविती वाया ।।
देव म्हणतात- जे माझे अनन्य भक्त आहेत त्यांच्याच आशीर्वादाने अग्नीचे व तेजाचे आयुष्य वाढले. ते भक्त या पृथ्वीतलावरील देवच आहेत. मी लक्ष्मीलाही दूर सारून, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला. मग त्यांच्या पायधुळीकरिता छातीचा खळगा पुढे केला, हे केवळ भक्तीमुळे.
मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती ।
फेडोनि कौस्तुभ घेतला हाती ।।
मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजा ।।
अलोलुप्तता हा दैवीसंपत्तीतील एक दैवी गुण आहे. पराकोटीची अलोलुप्तता कशी असते तर सर्व महासिद्धी बरोबर घेऊन स्वतः लक्ष्मीदेवी भगवंताकडे सेवेसाठी आली असताना श्रीविष्णूने तिच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. इतकी निर्मोहता फक्त भगवंताकडेच आहे.
हे असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशी ।
परी महाविष्णू जैसी । न गणिच ते ।।
ज्ञानराज म्हणतात – श्रीगुरूंच्या चरणांना नमस्कार करून मी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगणे सुरू करतो. तो ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीमातेचा पती. श्रीकृष्ण म्हणतात –
ते नमस्कारुनि आतां । तो पितामहाचा पिता ।
लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसे म्हणे ।।
ज्या स्वामीच्या योगाने चारी पुरुषार्थ सनाथ झाली. तो कृष्ण राया जेथे आहे तेथे लक्ष्मी असावयाचीच!
तैसे सकळ पुरुषार्थ । जेणे स्वामी का सनाथ ।
तो श्रीकृष्णरावो जेथ । तेथ लक्ष्मी ।।
ज्याच्याजवळ आपल्या पतीसह जगन्माता लक्ष्मी आहे. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे तेथे सर्वसिद्धी मूर्तिमंत उभ्या आहेत. म्हणून जेथे लक्ष्मी व श्रीकृष्ण व जेथे पंडुसुत अर्जुन आहे तेथेच विजय निश्चित आहे.
म्हणोनि जिया बाही उभा । तो लक्ष्मीयेचा वल्लभा ।
तेथे सर्वसिद्धी स्वयंभा । येर मी नेणे ।।
कौरव-पांडवाच्या युद्धात कोणाचा विजय होईल? या धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देताना ज्ञानराज म्हणतात –
म्हणौनि जेथ श्री तेथे श्रीमंतु । जेथ तो पंडूचा सुतु ।
तेथ विजय समस्तु । अभ्युदयो तेथ ।।
ज्ञानेश्वरीत भगवती, महिषासुरमर्दिनी जगदंबा, महालक्ष्मी माता, यांचे स्मरण करून ज्ञानराजांनी लक्ष्मीपूजन केले आहे.























































