लॉकडाऊनचा मधुमेही रुग्णांवरही परिणाम; रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारी आणि त्यामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे. तसेच अनेक उद्योगधंदेही ठप्प झाले आहेत. तसेच अनेक रुग्णांनाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक मधुमेही रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन असतो. त्यानिमित्ताने डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेक मधुमेही रुग्णांनी मधुमेह नियंत्रणात ठेवण्याबाबतच्या सूचनांचे पालन केले नाही. अनेकांना लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नाही. तर अनेकांनी औषधोपचाराकडे दुर्लक्ष केले. अनेक रुग्णांनी मधुमेहासाठी आवश्यक औषधे मिळाली नसल्याचे सांगितले. तर या काळात व्यायामशाळा बंद असल्याने तसेच घराबहेर पडण्यास मनाई असल्याने मधुमेहींना व्यायाम करणेही शक्य झाले नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम मधुमेहींच्या शरीरातील सारखेवर झाला आणि शरीरातील साखरेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचे काही रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात खाण्यापिण्याची पथ्थे अनेक मधुमेहींनी पाळली नाहीत. अनेकांनी खाण्याच्या वेळाही पाळल्या नाहीत. काही मधुमेही याकाळात आरोग्याबाबत निष्काळजीपणे वागल्याचे दिसून आले आहे, असे राज्यातील कोरोनाविरोधी टास्क फोर्सचे सदस्य आणि इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे डीन, अँडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आयएमपीएसीटी इंडियाच्या अहवालावरून लॉकडाऊनच्या काळात मधुमेही रुग्णांवर झालेल्या परिणामांची माहिती मिळाली आहे. एचबीए 1 सीचे प्रमाण नोव्हेंबर 2018 पासून कमी होत होते. लॉकडाउन सुरू होताच त्यात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. कोरोना महामारीच्या काळात मधुमेही रुग्णांच्या शरीरात साखरेची वाढ दिसून आलीच, त्यासोबतच कोरोना आणि इतर रुग्णांच्या शरीरातही साखरेचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

फार्मा नोवो नॉर्डिस्क यांच्या सहकार्याने मोहीम सुरू करण्यात आली आहे. एचबीए 1 सी मधुमेहाच्या पातळीत घट करण्याचे या 1000 दिवसांच्या मोहिमेचे उद्दीष्ट्य आहे. जुलै 2021 पर्यंत 8.6 टक्क्यांवरून एक टक्का म्हणजे 7.6 टक्क्यांपर्यत हे प्रमाण आणण्यात येणार आहे. त्यामुळे मधुमेहाशी संबधित अर्धांगवायू, हृदयविकार आणि मूत्रपिंड निकामी होणे, यासारखे धोके टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अहवालानुसार नोव्हेंबर 2018 पासून एचबीए 1 सी 8.6% होता. तो कमी होत गेला. मात्र, लॉकडाउन सुरू होताच तो वाढण्यास सुरवात झाली. जुलै ते सप्टेंबरमध्ये देशातील सरासरी एचबीए 1 सी 8.5% होता. तर मुंबईत एचबीए 1 सी एप्रिल ते जून 2019 मध्ये 8.1% वर होता. तर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 8.2% पर्यंत वाढ झाली होती.

कोरोना महामारीच्या काळात कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले होते, असे अनेक डॉक्टरांनी सांगितले. मधुमेहामुळे इतर गंभीर आजारांना निमंत्रण मिळते. तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि मधुमेह यांचाही संबंध असल्याचे दिसून आले आहे. तसेच कोरोनाचा प्रभावही मधुमेहीवर होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी काही रुग्णांना औषधे आणि इन्सुलीन वाढवण्याची गरज भासल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.