व्हीडिओ गेम खेळून नेट पॅक संपवला; मोठ्या भावाने चाकूने भोसकून केली हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने काही मुलांनी आत्महत्या केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. मात्र,मोबाईल गेममुळे जोधपूरमध्ये हत्या करण्यात आल्याी घटना घडली आहे. 12 वर्षांचा लहान भाऊ 23 वर्षांच्या मोठ्या भावाच्या मोबाईलवर व्हीडिओ गेम खेळत होता. त्यात तो एवढा रमला की मोबाईलचा नेट पॅक संपला. त्याचा राग आल्याने मोठ्या भावाने लहान भावाची चाकूने भोसकून त्याची हत्या केली आहे. ही घटना राजस्थानातील जोधपूरमध्ये घडली आहे.

जोधपूरच्या वीर दुर्गादास कॉलनीत कैलासदास चारण पत्नी आणि पाच मुलांसह राहतात. 12 वर्षांच्या रॉयने मोठा भाऊ रमणचा मोबाईल व्हीडिओ गेम खेळण्यासाठी घेतला होता. त्या गेममध्ये तो रमला, त्यामुळे कितीवेळ गेला, हे त्यालाही कळले नाही. व्हीडिओ गेम खेळल्याने मोबाईलचा नेट पॅक संपला. रमणला याचा राग आला. रागाच्या भरात त्याने रॉयला गच्चीवर नेले आणि चाकूने भोसकून त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह गच्चीवर तसाच ठेऊन तो घरातून चूपचाप निघून गेला.

कैलासदास चारण यांनी 23 वर्षांपूर्वी एका जपानी महिलेशी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांना तीन मुले आणि दोन मुली आहेत. मृत रॉय हा त्यांचा सर्वात लहान मुलगा होता. तर रमण मोठा मुलगा आहे. कैलासदास यांची मानसिक स्थिती बिघडली असून रमणचेही मानसिक संतुलन बिघडले होते, अशी माहिती मिळाली आहे.

रमण मुलांचे टेनीसचे प्रशिक्षण देत होता. त्याच्या कमाईवरच घरखर्च चालत असल्याने तो तणावात होता. रमण बुधवारी रॉयला घेऊन गच्चीवर गेला. आपल्या मोबाईलचा नेट पॅक संपल्याचे रमणच्या लक्षात आल्यावर रागाच्या भरात त्याने रॉयची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गच्चीवर तयाच सोडून तो घरातून निघून गेला. रॉयला शोधत त्याची आई आणि बहीण गच्चीवर आले तेव्हा रॉय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रमणने रागाच्या भरात हत्या केली किंवा मानसिक संतुलन ढळल्याने हे कृत्य केले, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.