
जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी गुरुवारी यमसदनी धाडलेले जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी 26 नोव्हेंबरला देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आले होते अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या दहशतवाद्यांजवळ मोठय़ा प्रमाणात शस्त्र्ाास्त्र आणि स्फोटके सापडली आहेत
जैशचे दहशतवादी बुधवारी रात्री पहाडांतील नाल्यांमधून साम्बा आणि हीरानगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर गुरुवारी पहाटे 3 च्या सुमारास महामार्गावरून जाणाऱया एका ट्रकमध्ये चढले. पाकिस्तानच्या सियालकोट येथून या दहशतवाद्यांशी संपर्क होत होता. दहशतवाद्यांना मदत करण्याची जबाबदारी मोहम्मद रऊफ याच्यावर होती. दहशतवाद्यांजवळ सापडलेल्या मोबाईल क्रमांकाची आता चौकशी केली जात आहे.
तांदळाची पोती असलेल्या ट्रकमधून हे दहशतवादी हिंदुस्थानात घुसले होते. कश्मीरच्या नगरोटा येथे लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ते मारले गेले. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा 26 नोव्हेंबर 2008 रोजी झाला होता. हे दहशतवादी येत्या 26 नोव्हेंबरलाच हल्ला करायला आले होते.
पंतप्रधानांनी केले जवानांचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चकमकीच्या घटनेचा आढावा घेतला. त्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल।ागार अजीत डोभाल आणि हेरखात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधानांनी जवानांच्या कारवाईचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी घातपाताचा होता कट
येत्या 28 नोव्हेंबर ते 19 डिसेंबरच्या दरम्यान आठ टप्प्यांमध्ये जम्मू-कश्मीरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्याची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकांपूर्वीच मोठा घातपात घडवण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता अशी माहिती जम्मू झोनचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी सांगितले. हे दहशतवादी शकरगढमार्गे हिंदुस्थानात दाखल झाले होते.


























































