
धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करून तिला चाकूचा धाक दाखवत मोबाईल आणि सोने चोरून पळून जाणाऱया दोघांना बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. ओमप्रकाश दीक्षित आणि रहीम शेख उर्फ गुड्डू अशी त्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार महिला या सोमवारी नातेवाईकांना भेटण्यासाठी भाईंदर येथे गेल्या होत्या. रात्री त्यानी बोरिवली येथून कांदिवली येथे जाण्यासाठी लोकल पकडली. त्या डब्यात ओमप्रकाश हा अगोदरच झोपला होता. काही अंतर गेल्यावर नशेत असलेल्या ओमप्रकाशने महिलेला चाकूचा धाक दाखवला. तेव्हा महिलेने ओमप्रकाशच्या कानाखाली मारली. त्यानंतर ओमप्रकाशने पुन्हा महिलेला चाकूचा धाक दाखवून विनयभंग केला. तर रहिमने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करून तिच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईल चोरला. महिलेने आरडाओरड केली. लोकल कांदिवली स्थानकात आल्यावर रहीम हा पळून गेला. घडल्या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी ओमप्रकाश विरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक भास्कर पवार यांच्या पथकाने तपास सुरु केला. तपास हाती येताच पोलिसांनी ओमप्रकाशला अटक केली.


























































