
केंद्र सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या हिंदुस्थान बंदला आज राज्यभरात संमिश्र प्रतिसाद लाभला. राज्यात विविध ठिकाणी भारतीय कामगार सेनेसह विविध संघटनांनी रस्त्यावर उतरुन आपला विरोध दर्शविला. ज्यात प्रामुख्याने बँक कर्मचाऱयांचा समावेश होता. परिणामी आज अनेक बँक व्यवहाराला फटका बसल्याचे चित्र राज्यात दिसून आले. तर मुंबईसह राज्यात शिक्षक भारतीसह अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी देखील या संपात भाग घेतला.
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. यात 10 हून अधिक केंद्रीय श्रमिक संघटना आणि राज्य कर्मचारी संघटना सहभागी झाल्या. याशिवाय असंघटित क्षेत्रातील संघटनांचे श्रमिकही यात सहभागी झाले होते. भाजपशी संबंधित भारतीय मजूर संघ मात्र या आंदोलनात सहभाग नाही.
शिक्षक रस्त्यावर
कामगार विरोधी कायदे रद्द करा, 100 टक्के अनुदान द्या, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षकांना शाळा-कॉलेजमध्ये 50टक्के उपस्थितीची अट रद्द करा, व्हॅक्सिन आल्याशिवाय शाळा-कॉलेज सुरु करू नका यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक भारतीने आज देशव्यापी संपात राज्यभर सहभाग नोंदवला. मुंबईत मुंबई विद्यापीठाच्या कलिना क@म्पस येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात आयफुक्टो, एमफुक्टो, बुक्टू आणि शिक्षक भारती सह इतर पालक, कामगार संघटनाही सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.
बँक व्यवहारांना बसला फटका
या संपात मोठय़ा प्रमाणात बँक कर्मचारी संघटना सामील झाल्या होत्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खासगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांमधील कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने बँक व्यवहारांना फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे.
पुण्यात बाजार बंद
या देशव्यापी बंदला पाठींबा दर्शविण्यासाठी पुण्यातील हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार संघटनेसह विविध संघटना पुढे सरसावल्या. परिणामी अनेक धान्य व भाजीपाला बाजार आज बंद ठेवण्यात आले होते.






























































