बाळ बोठेविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी, तपासासाठी पाच पथके रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे खून प्रकरणात नाव निष्पन्न झालेला पत्रकार बाळ बोठे याच्याविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाने विमान प्राधिकरणाला पत्र दिले आहे.

दरम्यान, बोठे याच्या शोधार्थ पाच पथके रवाना करण्यात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. रेखा जरे खून प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने सर्व आरोपींना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणात पत्रकार बाळासाहेब बोठे याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

तेव्हापासून बोठे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बाळ बोठेविरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाने  विमान प्राधिकरणला पत्र दिले आहे.

शनिवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्यासह पथकाने बोठे याच्या घराची झाडाझडती घेतली. मात्र, त्याचा ठावठिकाणा मिळाला नाही. कुटुंबीयाकडे चौकशी करण्यात आली असून, काही तांत्रिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. बोठेला अटक केल्यानंतर या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.