
>> निळकंठ कुलकर्णी
यं डाकिनिशानिकासमाजे निषेव्यमाणं पिशिताशनैश्व ।
सदैव भीमादिपद प्रसिद्ध तं शडकरं भक्तहितं नमामि ।।
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. हिंदुस्थानातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. अशी श्रद्धा आहे की शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. हे देऊळ तुलनेने अलिकडच्या काळात बांधलेलं आहे. याचा कळस नाना फडणवीस यांनी अठराव्या शतकाच्या सुमारास बांधला.
कथा –
हिंदू धर्मातील एक ग्रंथ असलेल्या शिवपुराणमध्ये लंकेचा राजा रावणाचा भाऊ कुंभकर्णाचा मुलगा आणि त्याचा अत्याचार तसेच त्याच्या संहाराची एक कथा आहे. कुंभकर्णाचा मुलगा भीमचा जन्म त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर झाला. लहानपणी त्याला या गोष्टीची जाणीव नव्हती की प्रभु श्रीरामांनी त्याच्या पित्याचा वध केला. जेव्हा भीमा मोठा झाला तेव्हा त्याला ही गोष्ट समजली. त्याने आपल्या पित्याच्या हत्येचा सूड घेण्याची शपथ घेतली. त्याला माहिती होत की, रामासोबत युद्ध करून जिंकणं एवढं सोपं नव्हत. यासाठी त्याने कठोर तपस्या केली आणि भगवान ब्रह्माला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांनी त्याला विजयी होण्याचे वरदान दिलं.
यानंतर भीमाने आपल्या असुर शक्तीचा वापर लोकांना नुकसान पोहोचवण्यासाठी केला. त्याच्या अत्याचारामुळे मानवच नाही तर देव देखील भयभीत होऊन त्रस्त झाले आणि शेवटी सर्व देवांनी भगवान शंकरांन जवळ मदत मागितली. भगवान शंकरांनी देवतांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करण्याचे वचन दिलं आणि स्वतः त्याचा संहार करण्याचा निर्णय घेतला. भगवान शंकरांनी ज्या स्थानी त्याचा वध केला ते स्थान देवतांसाठी पूजनीय बनलं. सर्वांनी भगवान शंकरांना त्या स्थानावर शिवलिंगाच्या रूपामध्ये प्रकट होण्याची प्रार्थना केली. भगवान शंकरांनी देवतांची गोष्ट मान्य केली आणि त्या स्थानी शिवलिंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले. तेव्हा पासून त्या स्थानाला भीमशंकर या नावाने ओळखल जातं.
ऐतिहासिक माहिती –
स्कंदपुराण व शिवपुराणात उल्लेख असलेले भीमा शंकर हे पवित्र ठिकाण आहे. समुद्र सपाटी पासून 3454 फूट उंचीवर असून हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर 7 व्या शतकात बांधले गेले. रघुनाथ पेशव्याच्या काळात या ठिकाणी विहिरीचे काम झाले होते. ह्या भागातील सावंत बंधूनी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन औरंगजेबाचा पराभव केल्याची माहिती आहे.
सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्दी झाडी जंगल व उंच डोंगराच्या खुशीत भीमाशंकराचे मंदिर वसले आहे. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूर्वीचे आहे. दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगतात. या घंटेवर 1729 असे इंग्रजीत नोंदवलेले आहे.
























































