इगो बाजूला ठेवा, उपाय शोधा; रोहित पवार यांचा भाजपला सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तत्कालीन कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2010मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना पाठवलेल्या पत्राच्या मुद्दय़ावरून भाजपने शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पवार यांचे नातू रोहित पवार यांनी ट्विट करीत इगो बाजूला ठेवा आणि उपाय काढा, असा भाजपला टोला हाणला आहे.

शरद पवार यांनी शीला दीक्षित यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यानंतर या पत्राचा आधार घेत भाजपने शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. कृषिमंत्री असताना शरद पवार यांना कायद्यांमध्ये मोठय़ा बदलाची आवश्यकता वाटत होती. पण आता त्यांच्या भूमिकेत बदल कसा झाला, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला. भाजपच्या या टीकेला रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

ट्विटमध्ये नेमके काय

शरद पवार यांनी शिवराजसिंह चौहान व शीला दीक्षित यांना लिहिलेल्या तत्कालीन पत्राचा संदर्भ देताना पत्राचा पहिला परिच्छेद वाचला जातो, पण पत्राचा पुढील भाग मात्र टाळला जातो. पत्र पूर्ण वाचले असते तर कदाचित ते पत्र कुठल्या कायद्याच्या संदर्भात लिहिले गेले आहे तेदेखील कळले असते आणि 2007 च्या मसुद्याचा नियमांचा अभ्यास केला असता तर कदाचित शेतकरी आंदोलन का करीत आहे? आणि त्यांच्या मागण्या काय आहेत? हेदेखील समजले असते. केलेले कायदे बरोबरच आहेत, चुकीचे नाहीत, मागे घेण्याचा प्रश्नच नाही हा केंद्र सरकारनं आपला इगो बाजूला ठेवायला हवा आणि विरोध कशासाठी हे समजून त्यावर उपाय काढायला हवा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.