गोव्यात जिल्हा पंचायतींसाठी उद्या मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नियोजित वेळापत्रका प्रमाणे मार्च मध्ये कोविड मुळे होऊ न शकेलेली जिल्हा पंचायत निवडणूक उद्या 12 डिसेंबर रोजी होणार आहे.निवडणूक मतपत्रिकांद्वारे होणार असून मतदानाच्या शेवटच्या तासात कोविड रुग्ण मतदान करू शकणार आहेत.त्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्व जाहिर करण्यात आली आहेत. पक्षीय पातळीवर होणारी ही निवडणूक 2022 च्या विधानसभे पूर्वी राजकीय पक्षांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार असल्याने सत्ताधारी भाजपा बरोबर विरोधी पक्ष काँग्रेस,मगो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

गोव्यात जिल्हा पंचायतीच्या उत्तर गोव्यात 25 आणि दक्षिण गोव्यात 25 मिळून एकूण 50 जागा आहेत.त्यातील दक्षिण गोव्यात मोडणाऱ्या सांखवाळ मतदार संघातून भाजपाच्या उमेदवार अनिता थोरात या बिन विरोध निवडून आल्या असल्याने तेथे मतदान होणार नाही.त्याशिवाय दक्षिण गोव्यातीलच नावेली येथील एका उमेदवाराचे निधन झाल्याने तेथे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंतर निवडणूक घेतली जाणार आहे.त्यामुळे उद्या  उत्तर गोव्यातील 25 आणि दक्षिण गोव्यातील 23 मिळून फक्त 48 जागांसाठी मतदान होणार आहे.

मतमोजणी 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. 14 रोजी मध्यरात्री 12 वाजे पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत मतदान होणार आहे.शारीरिक दूरी,मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.शेवटचा एका तास कोविड रुग्णांना मतदान करण्यासाठी  ठेवला जाणार आहे. प्रचारा पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने उमेदवारांना मतदारांशी व्यक्तिगत संपर्क साधण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.त्यामुळे गेले चार दिवस सर्वत्र उमेदवारांची धावपळ पहायला मिळाली.

यावेळी निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जात आहे.उत्तर गोव्यात भाजपा 25,काँग्रेस 21,राष्ट्रवादी काँग्रेस 3,मगो पक्ष 7 , आप 7 ,राष्ट्रीय समाज पक्ष 1 आणि 40 अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दक्षिण गोव्यात भाजपा 16,काँग्रेस 16,राष्ट्रवादी काँग्रेस 3,मगो पक्ष 10,आप 13 आणि 38 अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.एकूण 200 उमेदवारां मध्ये भाजपाचे 41,काँग्रेसचे 37,राष्ट्रवादी काँग्रेसचे 6,मगो पक्षाचे 17,आपचे 20,राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 आणि 78 अपक्ष उमेदवार आपले भवितव्य अजमावून पाहत आहेत.

उत्तर गोव्यातील 25 जागांसाठी 104 तर दक्षिण गोव्यातील 96 जागांसाठी 96 मिळून एकूण 48 जागांसाठी 200 उमेदवार निवडणूक  रिंगणात आहेत. उत्तर गोव्यात 4 लाख 18 हजार 921 तर दक्षिण गोव्यात 3 लाख 72 हजार 893 मतदार 200 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. उत्तर गोव्यात 453 तर दक्षिण गोव्यात 402 मिळून 855 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.उत्तर गोव्यात 6 तर दक्षिण गोव्यात 4 मतदान केंद्रे संवेदनशील असून तेथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 9 हजार 500 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.त्याशिवाय बंदोबस्तासाठी पोलिस तैनात केले जाणार आहेत.