
>> उल्हासदादा पवार
पवारसाहेबांच्या लग्नाला आम्ही सगळे मित्रमंडळी उपस्थित होतो. धनाजीराव जाधव, बापूसाहेब थिटे, बबनराव किराड, शिवाजीराव ढमढेरे (जे पुढे विद्यापीठात इस्टेट मॅनेजर झाले) या सगळ्यांमध्ये मी तसा तरुण होतो. 1967 मध्ये साहेब आमदार झाल्यानंतर लगेच त्यांचे लग्न झाले. लग्नामध्ये आम्हा कुणालाच काही आहेर करता आला नाही, म्हणून उभयता दोघांनाही आम्ही जेवणाचे आमंत्रण दिले. बापूसाहेब थिटे हे पुण्यात गणेश पेठेत राहायचे. त्यांच्या घरीच जेवणाचा बेत ठरला. साहेबांशी बोलून तो पक्का केला. सर्वांनी मिळून पवारसाहेबांना आहेर काय करायचा याचा विचार केला. आपण वर्गणी काढून पवारसाहेबांना सोन्याची अंगठी करूयात अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा मी म्हणालो, पवारसाहेबांना मी जवळून ओळखतो. त्यांनी कधी अंगावर सोनं घातलेले मी बघितले नाही. ते घालणारदेखील नाहीत. त्यामुळे आपण दुसरी काहीतरी वस्तू घेऊया असे सुचवले, परंतु बाकी सोन्याच्या अंगठीचा आग्रह आणि एकमत झाल्याने अंगठी करण्याचा निर्णय झाला. सोन्या मारुती चौकातील सराफाकडून ती घडवूनदेखील घेतली. पवारसाहेब आणि प्रतिभाताई ठरल्याप्रमाणे बापूसाहेब थिटे यांच्या गणेशपेठेतील घरी जेवणासाठी आले. बापूंच्या आईने जेवणाचा छान बेत केला होता. जेवण झाल्यानंतर एकत्र बसून थोडय़ा गप्पा सुरू झाल्या.आमची छोटेखानी भाषणेदेखील झाली. यादरम्यान बापूसाहेब आणि धनाजीरावांनी पवारसाहेबांच्या जवळ जाऊन त्यांना आम्हाला लग्नाच्या गडबडीत आणि गर्दीमध्ये तुम्हाला आहेर देता आला नाही म्हणून आज आम्ही सर्वांनी मिळून तुमच्यासाठी आहेर आणला आहे, असे म्हणत एका डबीमधून सोन्याची अंगठी काढली. ती घेण्याचा आग्रह पवारसाहेबांना केला. सोन्याची अंगठी बघून पवार थोडेसे थबकले. नम्रपणे म्हणाले, मी कधीही सोनं वापरलेले नाही आणि घालतदेखील नाही. असे म्हटल्यावर सर्वजण हिरमुसले, आपल्या मित्रांचे चेहरे त्यांनी ओळखले. तुम्हा सर्वांच्या प्रेमाची आठवण म्हणून ही सोन्याची अंगठी मी घेणार नाही, पण तुम्ही प्रतिभाकडे द्या. आम्ही अंगठी प्रतिभाताईंकडे दिली. मोठय़ा आपुलकीने ती त्यांनी स्वीकारली. पवारसाहेबांनी आमच्या आहेरासाठी योग्य मार्ग काढला.


























































