भिवंडी हादरली… 3 मुलांना गळफास देऊन आईची आत्महत्या, चौघांचेही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीच्या कचोरे खाडीपात्रात आपल्या दोन चिमुकल्यांना सोडून आई गायब झाल्याची घटना ताजी असतानाच भिवंडीच्या पाच्छापूर जंगलात तीन मुलांना गळफास देऊन मातेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने भिवंडी हादरली असून झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत चारही जणांचे मृतदेह दिसून आले.

दोन महिन्यांनंतर चौघांचा अक्षरशः सांगाडा झाला होता. पत्नी आणि तीन मुलांचे पार्थिव बघून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी विष पिऊन स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असून जे. जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भिवंडी तालुक्यातील उंबरखांड या गावात राहणारे श्रीपत बांगारे यांनी आपली पत्नी रंजना (30) तसेच दर्शना (12), रोहिणी (6), रोहित (9) ही तीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार 21 ऑक्टोबर रोजी पडघा पोलीस ठाण्यात केली होती. बऱयाच ठिकाणी शोध घेऊनही पत्नी व मुलांचा थांगपत्ता लागला नाही.

गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ संतोष हा पाच्छापूर येथील जंगलात लाकडे शोधण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका झाडावरून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन बघताच त्या झाडाला चारही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. मात्र कपडय़ांमुळे त्याला संशय आला आणि भाऊ श्रीपत याला ते दाखवले. या कपडय़ांवरून चौघांचीही ओळख पटली.

ही तर हत्याच

ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मृत रंजनाचा भाऊ अनंता भगत याने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच ही आत्महत्या की हत्या याचा छडा लागणार आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या रंजनाचा पती श्रीपत याने तीन महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न केले होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कौटुंबिक ताणतणावातून रंजना हिने टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे