
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसैनिकांनी शनिवारी बीडमध्ये आंदोलन केले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा शिवसैनिकांनी समाचार घेत आपला संताप व्यक्त केला. यावेळी दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा पायदळी तुडवत जाळण्यात आला.
केज, धारूर, अंबाजोगाई, परळी, माजलगावमध्ये जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. या वाढणाऱ्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. एकीकडे तेलाच्या कच्च्या किंमतीमध्ये घट झाली असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असल्याने शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले.
या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी राग व्यक्त केला. तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेच शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनावर आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. रावसाहेब दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळा पायदळी तुडवत त्यांचे फोटो जाळण्यात आले. ‘शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना बडवा’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी केजमध्ये तालुकाप्रमुख रत्नाकर, शहरप्रमुख अनिल बडे, अरविंद थोरातसह शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.



























































