प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2020 या वर्षात अनेक कलाकारांचे दुर्दैवी आणि अकाली मृत्यू झाले. त्यात अजून एका नावाची भर पडली आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या एका अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

या अभिनेत्रीचं नाव आर्या बॅनर्जी असं आहे. आर्या ही दिवंगत सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी आहे. शुक्रवारी कोलकात्याच्या दक्षिण भागातील तिच्या राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळली आहे.

शुक्रवारी सकाळी तिच्या घरी कामाला येणाऱ्या महिलेने दार ठोठावले. मात्र, तिचा काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे तिने फोन करून पाहिला. मात्र, फोनलाही कसलंच उत्तर दिलं नाही. त्यामुळे संशय आल्याने घरकाम करणाऱ्या महिलेने शेजाऱ्यांना पोलिसांना बोलवण्याची विनंती केली.

पोलिसांनी तिच्या घराचा दरवाजा तोडला. तेव्हा आत तिच्या खोलीत आर्या मृतावस्थेत आढळली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी तिच्या खोलीतून आवश्यक ते न्यायवैद्यकीय नमुने गोळा केले आहेत. शवविच्छेदनानंतरच तिच्या मृत्युचं गूढ उकलणार आहे.

आर्या बॅनर्जी हे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव नसलं तरी ती काही बॉलिवूडपटात झळकली होती. विद्या बालन अभिनित ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात तिने शकिलाची भूमिका केली होती. तसंच दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटातही ती दिसली होती.