
नांदगाव रोडवरील एका दुकानातून चोरट्यांनी बॉयलर सूट आणि शूज गायब करत रोख रक्कमही लंपास केली. तर दुसऱ्या एका किराणा दुकानातून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली.
या चोरीच्या दोन्ही घटना मनमाडमध्ये घडल्या. मनमाड-नांदगाव रोडवर धोटाणे बुद्रूक शिवारात बीपीसीएल कंपनीच्या गेटजवळ असलेल्या रेणुका माता शूज सेफ्टी इक्विपमेंट या दुकानाच्या पाठीमागील पत्र्याचे शटर वाकवून चोरांनी 50 हजार 800 रूपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषा नागरे (48, रा. मनमाड) यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे.
नागरे यांनी सकाळी दुकान उघडले असता पाठीमागील पत्र्याचे शटर त्यांना उघडे दिसले. अज्ञात चोरांनी दुकानाचे सामान अस्ताव्यस्त केले होते. ड्रॉव्हरमधील 39 हजार रूपये रोख व 11 हजार 800 रूपयांचे बॉयलर सूटचे 8 ते 10 नग व शूज जोड असा 50 हजार 800 रूपये किमतीचा माल चोरण्यात आला आहे.
दुसऱ्या एका घटनेत किराणा दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यांतील 40 हजार रूपये रोख लंपास केले आहेत. संतोष हिरामण सांगळे (36, रा. पानेवाडी) यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे. त्यांच्या वैष्णवी किराणा दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी दुकानात प्रवेश केला व गल्ल्यांतील 40 हजार रूपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी मनमाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.


























































