रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेपूर्वी ‘टीम इंडिया’ला दिलासा देणारी बातमी आली आहे. बऱयाच दिवसांपासून आपल्या तंदुरुस्तीमुळे चर्चेत असलेला हिंदुस्थानचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा मंगळवारी ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी रवाना झाला. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होताच रोहित शर्माला 14 दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. याचाच अर्थ तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर कोरोना चाचणीत निगेटिव्ह आल्यानंतर रोहित तिसऱया कसोटीसाठी हिंदुस्थानी संघात दाखल होऊ शकतो. पहिल्या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्यामुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱयावर गेल्याने ‘टीम इंडिया’ला मोठा दिलासा मिळाला आहे.

सराव करताना स्मिथला दुखापत

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण काही सुटेना. कारण आता त्यांचा प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथचा मंगळवारी सराव करताना पाठीचा स्नायू दुखावला गेला. त्यामुळे दहा मिनिटांतच त्याला सराव शिबीर सोडावे लागले. गळ्यात खवखव होत असताना स्मिथ सरावासाठी मैदानावर आला होता. मात्र एक चेंडू अडविण्यासाठी खाली वाकल्यानंतर त्याच्या पाठीत उसन भरली. बुधवारी सकाळीही तो सरावाला येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्मिथच्या आधी अॅश्टन अॅगर, मोयसेस हेन्रीक्स, डेव्हिड वॉर्नर, कॅमरून ग्रीन, जॅक्सन बर्ड, हॅरी काॅनवे व सीन अॅबट या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना दुखापत झालेली आहे. आजच्या दुखापतीमुळे स्मिथ पहिल्या कसोटीला मुकला तर ऑस्ट्रेलियासाठी तो मोठा धक्का असेल.