पुण्यात धोनी क्रिकेट ऍकॅडमीचा श्रीगणेशा, क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीच्या माध्यमातून देणार अत्याधुनिक प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या महेंद्रसिंग धोनीच्या महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमीचे नवीन वर्षात पुण्यात आगमन होत आहे. पुण्यातील क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीच्या साथीने महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमी येथील युवा क्रिकेटपटूंना अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाली आहे. या अॅकॅडमीचे उद्घाटन जानेवारी 2021 च्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे.

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अॅकॅडमीचे संचालक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेरिल कलीनन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी रणजी खेळाडू बाबूराव यादव, ओनेल नोह, सोहेल रौफ, क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीचे गजेंद्र पवार आणि अनिल वाल्हेकर, उमेश पाथरकर, अमोल माने उपस्थित होते. डेरिल कलीनन म्हणाले, पुण्यात अनेक दर्जेदार क्रिकेट अॅकॅडमी आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील नव्या क्रिकेटपटूंना अत्याधुनिक पद्धतीचा सराव आणि सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावे यासाठी एम. एस. धोनी क्रिकेट अॅकॅडमीच्या सहकार्याने क्रिकेट मास्टर्स अॅकॅडमीने मास्टर प्लॅन तयार केला आहे. खेळाडूंना उच्च दर्जाचे मार्गदर्शन, शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमता वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. क्रिकेटवेडय़ा हिंदुस्थानमध्ये नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे पुण्यातही क्रिकेटपटू घडविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले.