परभणी – 800 किलो गोमांस जप्त, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने गुरूवारी एक लाख साठ हजार रुपये किमतीचे आठशे किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना गोमांस नेण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.  या माहितीनंतर पोलिसांनी पेडगाव फाटा परिसरावर लक्ष ठेवले होते.   पोलिसांना बगीचा ढाब्याजवळ एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी दिसली.  पोलिसांनी ही गाडी थांबवून त्याच्या चालकाची चौकशी केली.

चौकशीदरम्यान चालकाने त्याचे नाव मोमिन यसुफ़ मोमिन अजिम (रा.बीड) असल्याचे  सांगितले.  पोलिसांनी चालकाला गाडीमध्ये काय आहे, असे विचारले.  त्यावेळी त्याने गोमांस असल्याचे सांगितले.  हे मांस अब्दुल समद अब्दुल रहिम कुरेशी (रा.परभणी) यांचे असल्याचे मोमिनने सांगितले.  हे गोमांस खंडोबा बाजार परभणी येथून भरले असून पाथरी येथे नेण्यात येत असल्याची माहितीही चालकाने दिली. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता त्यात आठ टाक्यांमध्ये गोमांस ठेवले असल्याचे दिसून आले.

गाडीत असलेले मांस हे गोमांसच असल्याची खात्री करून घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे.के. सोळंके यांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते.  त्यांनी पाहणी केल्यानंतर ते गोमांसच असल्याचे सांगितले.  डॉ.सोळंकेंचा अहवाल मिळाल्यानंतर  पोलीस पथकाने गोमांसाने भरलेले वाहन ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले.  या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  विशेष पथकाचे पोलिस उपअधीक्षक बाबासाहेब दडस, फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, राहुल चिंचाणे, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी पठाण या पथकाला गोमांस नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.