
ऑस्ट्रेलियाने अॅडलेड येथील डे-नाईट कसोटी जिंकली आणि मालिकेत आघाडी घेतली. हिंदुस्थानचा संघ या कसोटीत अत्यंत वाईट पद्धतीने हरला. त्यामुळे 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱया मेलबर्न येथील दुसऱया कसोटीत टीम इंडियाच्या संघात बदल होतील हे निश्चित आहे. युवा सलामीवीर शुभमन गिल, फॉर्ममध्ये असलेला लोकेश राहुल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, नवदीप सैनी हे खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत बेंचवर बसले आहेत. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ व यष्टिरक्षक रिद्धीमान साहा यांना अॅडलेड कसोटीच्या दोन्ही डावांत अपयशाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे या दोघांना पुढील कसोटीत अंतिम 11मध्ये स्थान देण्यात येईल असे वाटत नाही. मात्र मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार अजिंक्य रहाणे संघनिवडीबाबत कोणता निर्णय घेताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.
विराटच्या अनुपस्थितीत राहुलची एण्ट्री
विराट कोहली आता ऑस्ट्रेलियातील उर्वरित तीन कसोटींमध्ये खेळणार नाही. अशा परिस्थितीत मधल्या फळीत अनुभवी खेळाडूची एण्ट्री होऊ शकते. लोकेश राहुलला सलामीऐवजी मधल्या फळीत खेळवण्यात येण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे लोकेश राहुलचे दुसऱया कसोटीतील स्थान हे निश्चितच आहे.
शमी बाहेर, युवा वेगवान गोलंदाजांचा समावेश
पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे आता तो उर्वरित तीन कसोटींमध्ये खेळणार नाहीए. मात्र त्याच्याऐवजी अंतिम अकरामध्ये कोणाला स्थान देण्यात येईल हे पाहायला नक्कीच आवडेल. इशांत शर्मा, भुवनेश्वरकुमार या दोन प्रमुख गोलंदाजांना दुखापतीमुळे या मालिकेत खेळता येत नाहीए. त्यामुळे जसप्रीत बुमराह व उमेश यादव यांच्या जोडीला मोहम्मद सिराज व नवदीप सैनी यांच्यापैकी एका युवा वेगवान गोलंदाजाची निवड करण्यात येईल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.
साहा की पंत?
रिद्धीमान साहाला अॅडलेड कसोटीत दोन्ही डावांमध्ये निराशेलाच सामोरे जावे लागले. दोन्ही डावांमध्ये तो ज्या पद्धतीने बाद झाला तेदेखील वाईट होते. त्यामुळे मेलबर्न कसोटीत त्याला संघात स्थान देण्यात येईल असे वाटत नाही. रिषभ पंतने मागील ऑस्ट्रेलियन दौऱयात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले होतील असे म्हणायला हरकत नाही. पण अखेरचा निर्णय हा संघ व्यवस्थापनाचा असेल. त्यामुळे अनुभव वि. युवा यामधील शर्यत कोण जिंकेल याबाबत आताच सांगणे कठीण आहे.
सलामीवीर कोण?
ऑस्ट्रेलियन दौऱयावर गेलेल्या हिंदुस्थानी संघात चार सलामीवीर फलंदाजांचा समावेश आहे. पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, शुभमन गिल व लोकेश राहुल ही त्यांची नावे. पृथ्वी शॉ व मयांक अग्रवाल यांना मागील कसोटीमधील चांगल्या कामगिरीच्या आधारावर पहिल्या कसोटीत संधी दिली. पण दोन्ही डावांमध्ये दोघांनाही अपयश आले. आता दुसऱया कसोटीत या दोघांवरच टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वास दाखवेल का, असा प्रश्न यावेळी उभा राहतो. मात्र दोघांपैकी एकाला संधी देण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही. पण दोघांना आणखी एक संधी मिळेल असे वाटत नाही. शुभमन गिलला सलामीवीर म्हणून संघात खेळवू शकतात. लोकेश राहुललाही थम्स अप दाखवू शकतात.



























































