दांडी गुल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

हिंदुस्थानी फलंदाजीने स्वतःला लोकरीच्या गुंडय़ासारखं गुंडाळून घेऊन सांघिक प्रयत्नात धावांचा नीचांक मोडला. सोपं नाही. इंग्लंडविरुद्धचा 42 धावांचा शोचनीय नीचांक मोडून नवीन 36 धावांचा नीचांक निर्माण करण्यासाठी त्यांना 46 वर्षांचा प्रदीर्घ कालखंड लागला. त्यावेळची क्रिकेटप्रेमींची पिढी एक तर स्वर्गी गेल्येय किंवा माझ्यासारखी हतबल होऊन तोंडातले उरलेसुरले दात मोजावेत तसे हिंदुस्थानी फलंदाजांनी फेकलेल्या विकेटस् मोजत बसले. एवढे नामवंत फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी जातायत मग ही वाताहत बघायला आपण का राहिलोय, हा प्रश्न आम्ही स्वतःला पाडून घेतला. सगळय़ांनी मिळून 36 धावा केल्या? (केल्या की झाल्या?)

गुलाबी चेंडू, दिवस-रात्र सामना, अॅडलेडची विकेट व ऑस्ट्रेलियाचा तुफानी वेगवान मारा यांच्यासमोर आपल्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. आता पश्चात विचार करताना बुमराहला ‘नाइट वॉचमन’ म्हणून पाठवणं हा विनोद वाटतो. एकदा तर एक धाव टाळून बुमराहने अगरवालला ‘स्ट्राइक’ देणं टाळलं. बुमराह जर अगरवालचं रक्षण करू शकत असेल तर पुजाराचं रक्षण करायला शमीला व रहाणेचं रक्षण करायला उमेश यादवला पाठवावं लागेल. त्यानंतर शॉ, कोहली व विहारी यांचं रक्षण करायला पुरेसं शेपूट नाही याबद्दल आपण सामुदायिक गळा काढूया. दाणादाण, पळापळ, घाबरगुंडी हे शब्द अशाच वेळी वापरायचे असतात ना?

मागल्या दौऱयात आपण मालिका जिंकली होती हे विसरून चालणार नाही. पण इथे प्रश्न हारजीतचा नाहीच आहे. हरलो असतो तर ओके. यापूर्वी कधी हरलो नव्हतो की काय? पण या वेळी माणसं घुसमटतायत, दाढी आणि केस उपटतायत, एकमेकांच्या नजरा चुकवतायत, बोंबा मारतायत, कपाळ बडवतायत; कारण आपण धावांचा नीचांक गाठलाय. ज्या विकेटवर पहिल्या डावात आपण ऑस्ट्रेलियावर साठ धावांचा ‘लीड’ घेऊन सामना जिंकण्याच्या स्थितीत आलो होते असं केवळ आपल्यालाच नाही तर गिलख्रिस्ट, वॉर्न व मार्प वॉ या दिग्गज ऑस्ट्रेलियन समालोचकांनाही वाटू लागलं होतं. त्यानंतर दुसऱया डावात हिंदुस्थानचं अक्षरशः शिरकाण झालं, पानिपत झालं. गोलंदाज काय खेळतील असे आपले फलंदाज खेळले. कोणाची ‘बॅकलिफ्ट’ जास्त होती, कोणी ‘लेंथ’चा अंदाज येण्यापूर्वीच पुढे पाय टाकत होता, कोणाला ‘लाइन’ कळत नव्हती, कोणी उसळीपुढे बावरून जात होता, कोणी बिचारा सहकाऱयांना वाईट वाटू नये म्हणून नुसताच बाद होत होता – वृद्धिमान साहाप्रमाणे!

हिंदुस्थानी फलंदाजीच्या त्रेधातिरपिटीवर अनेक विनोद वाचायला मिळाले. त्यातला मला सर्वांत भावलेला विनोद हा – 9420408404. हा माझा नंबर नाही. हा आहे हिंदुस्थानच्या पहिल्या दहा फलंदाजांनी प्रत्येकी केलेला स्कोअर. टी.व्ही.वर उभय संघाचे त्रोटक स्कोअर येतात त्यात अगरवालचा 9 हा सर्वोच्च स्कोअर म्हणून आला होता. अवहेलनेचीदेखील ही लक्तरे म्हणावी लागतील. पुढील कित्येक वर्षे कोहलीच्या या संघाचा उद्धार होत राहील. त्यामुळे आपण संघात नव्हतो याचा जडेजाला आनंद होत राहील. या सगळय़ा तथाकथित विनोदाच्या मुळाशी वाटय़ाला आलेले नैराश्य आहे. विनोदाच्या माध्यमातून ते बाहेर पडतंय. काय केलंत (म्हणजे केलं नाहीत) रे चांडाळांनो! नुसता डाव गडगडला नाही, तर तो मातीत गाडला गेला.

चेतेश्वर पुजारा हा प्रकार मला कळूच शकलेला नाही. तो म्हणे, ‘सॉलीड’ आहे. म्हणजे नक्की काय आहे? दहा-पंधरा धावा करायला तो साधारण शंभर चेंडू घेतो. अशा पद्धतीनं खेळून तो साठ, सत्तर, ऐंशी धावा करतो तेव्हा त्याची पूर्मगती फलंदाजी क्षम्य समजली जाते. पण असे चेंडू वाया घालवून तो लवकर उडतो तेव्हा काय? तो ‘डेड डिफेन्सिव्ह’ खेळतो. एकेरी धावाही तो काढत नाही, काढू शकत नाही. त्याच्या या अत्यंत नकारात्मक फलंदाजीत तो समोरच्या गोलंदाजाला जोरात आणतो त्याचं काय? ‘मी मर्यादित षटकांच्या सामन्यातही खेळू शकतो’ असा दावा त्याने मागे एका मुलाखतीत केला होता. शक्य आहे, पण मर्यादित षटकांच्या सामन्यात तू जलदगतीने धावा काढू शकतोस असा निवड समितीला विश्वास वाटण्याजोगा झंझावाती खेळ तू त्यांना कुठे आणि कधी दाखवलायस?

काही प्रश्न –

1) कर्णधार म्हणून संघात येण्यासाठी खेळाडू म्हणून आधी संघात येणं आवश्यक नाही का?
2) फलंदाजीच्या तंत्रातच काही दोष असतील आणि प्रतिपक्षातील गोलंदाजांना ते कळले असतील तर हे दोष दूर केल्यानंतरच या फलंदाजांचा संघात समावेश व्हावा असे वाटत नाही का?
3) पराभूत सैन्याप्रमाणे पळापळ काय कामाची? जे आहेत त्यांनीच कंबर कसून लढायला नको का?
4) अष्टपैलू म्हणता येईल असा जखमी जडेजा सोडून एकही खेळाडू संघात का नाही?
5) वृद्धिमान साहाच्या जागी राहुल किंवा पंत हे फलंदाजी करणारे यष्टिरक्षक खेळवावेत का?
6) यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्यावर तुमचा विश्वास नसेल तर त्यांना तुम्ही संघात कशासाठी घेतलंय?
7) एकाएकी क्षेत्ररक्षण का ढेपाळलंय? ऑस्ट्रेलियन फलंदाज पुनःपुन्हा झेल देतील अशी अपेक्षा आहे का?
8) अॅडलेड येथील दारुण पराभवानंतर आपण काय शिकलो? मुळात काही शिकण्याची आपल्या खेळाडूंची इच्छा आहे का? अशा प्रसंगी प्रशिक्षक रवी शास्त्री पॅमेऱयापुढे का येत नाही?

चौऱयाहत्तर साली हिंदुस्थानचा 42 धावांत खुर्दा उडाला होता तेव्हा मी एक लेख लिहिला होता. त्यात नवरा ऑफिसातून येतो, बायको त्याच्यासाठी घाईघाईत कांदेपोहे करायला घेते. एकेका कृतीबरोबर आपली एकएक विकेट पडत असते. बायको कांदेपोह्याची बशी नवऱयापुढे करते आणि तिकडे आपली शेवटची विकेट पडते.

बेचाळीस ऑल डाऊन!

आता 36 धावांत बसणारी कांदेपोह्यांपेक्षा कमी वेळ खाणारी डिश कोणती? मला वाटतं ‘एग फ्राय’!