
दारू तस्करांविरोधात कारवाईदरम्यान जमावाकडून होणारे हल्ले थोपवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्य़ांना आता हेल्मेट, लाठी आणि ढाल मिळणार आहे. सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या या कवचपुंडलाची खरेदी प्रक्रिया पुढील वर्षात केली जाणार आहे.
राज्यात अवैधरीत्या गावठी, हातभट्टीची दारू तयार करणाऱ्य़ांवर उत्पादन शुल्क विभाग सतत कारवाई करत असते. त्यातच स्पिरीट चोरी आणि परराज्यातून आणल्या जाणाऱ्य़ा दारू तस्करीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी घेतली जाते. गावठी आणि हातभट्टी दारू तयार करणारे तस्कर हे खाडीकिनारी दारूच्या भट्टय़ा उभारतात. त्या ठिकाणी कारवाईसाठी पोहचताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्य़ांना जीव धोक्यात घालून जावे लागते. अधिकारी गावामध्ये कारवाईसाठी गेले असता जमावाकडून हल्ला होण्याच्या घटना घडतात, तणावाचे वातावरण निर्माण होते. कित्येकदा दगडफेकदेखील केली जाते. लॉकडाऊनच्या काळात कारवाईसाठी गेलेल्या जवानांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कल्याण येथे भरारी पथकातील निरीक्षक आणि दोन जवानांवर जमावाने हल्ला केला, तर तुळजापूर येथेही जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले होते. तसेच पुण्यात दारूचा ट्रक पळवून नेण्याची घटना घडली होती. त्या तिन्ही घटनांची गंभीर दखल घेण्यात आली. कारवाईसाठी जाणाऱ्य़ा जवानांसाठी लाठी, हेल्मेट आणि ढाल खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
एक कोटीची तरतूद
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्य़ांना गस्तीसाठी 19 नवीन गाडय़ांची खरेदी केली जाणार आहेत, तर कारवाईला जाण्यासाठी आणि आरोपींना ने-आण करण्यासाठी पोलिसांसारख्या 6 नवीन गाडय़ा खरेदी करण्यात येणार आहेत. त्या गाडय़ा ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूर विभागाला दिल्या जाणार आहेत. साहित्य खरेदीसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अनेक वेळा अडचणीच्या ठिकाणी जवानांना कारवाईसाठी जावे लागते. तेव्हा त्यांच्यावर अचानकपणे हल्ला होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्य़ांच्या सुरक्षेसाठी लाठी, हेल्मेट आणि ढाल खरेदी केली जाणार आहे. खरेदीची प्रक्रिया नवीन वर्षात केली जाणार आहे.– कांतिलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग






























































