कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे ब्रिटन पुन्हा लॉकडाऊन; रुग्णसंख्येत वेगाने वाढ, विमानसेवा स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे ब्रिटनला पुन्हा धडकी भरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने लंडन आणि आसपासच्या परिसरात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. ब्रिटनसह युरोपिय देशांमध्येही कोरोनाच्या या नव्या अवताराने धुमाकूळ घातला आहे. संसर्ग टाळण्यासाठी नेदरलॅन्ड, बेल्जियम आणि जर्मनीने ब्रिटनमध्ये आपली विमानसेवा स्थगित केली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये 30 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. नवा विषाणू हा पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक वेगाने पसरतो असे दिसून आले आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पूर्वीच ही परिस्थिती उद्भवल्याने ब्रिटनमधील नागरिकांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत.

गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले होते. त्यानंतर इटली, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये या विषाणूचा प्रसार झाला होता. त्यामुळे यावेळी हे देश अधिकच सावध झाले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूबद्दल ब्रिटनमधून अधिक माहिती गोळा केली जात आहे.