पुण्यात रानगव्याचा गवगवा; गव्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील पाषाण तळ्यानजीक सोमवारी सकाळी नागरिकांना पुन्हा एकदा रानगवा दिसला. त्यामुळे परिसरात व्यायाम करण्यासाठी गेलेल्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. कोथरूड परिसरात 13 दिवसांपूर्वी अशाचप्रकारे आलेल्या रानगव्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा रानगवा फिरताना दिसल्यामुळे नागरिकांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. रानगव्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

पाषाण तळ्याजवळ असलेल्या एका मोकळ्या जागेत सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नागरिकांना रानगवा दिसला. त्यामुळे गव्याला पाहताच नागरिकांनी वनविभागासह पोलिसांना माहिती दिली. काही वेळानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रानगव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, लोकांना पाहून रानगवा परिसरात पळू लागला. वनविभागासह पोलीस प्रशासनाने गव्याला नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, नागरिकांसह वाहनांची गर्दी पाहून गव्याने पुन्हा रस्त्याने पळ काढला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यानंतर हळूहळू गर्दी वाढल्याने रानगवा सैरावैरा पळू लागला. रस्त्यासह परिसरातील मोकळ्या जागेतून रानगवा पळत असल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पाषाण परिसरातील एका कंपनीजवळ असलेल्या जंगल परिसरात रानगव्याने धूम ठोकली. वनविभागाकडून रानटी गव्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून तो जंगल परिसरात गेल्यामुळे रेस्क्यूला अडथळा निर्माण झाला आहे.

रानगव्याला पकडण्यासाठी विशेष काळजी
कोथरूड परिसरात 9 डिसेंबरला आलेल्या रानगव्याला सहानुभूतीने वागणूक देण्याची आवश्यकता होती. मात्र, हुल्लडबाजी करणाऱ्या अतिउत्साही नागरिकांमुळे रानगव्याला जीव गमवावा लागल्याचे स्पष्टीकरण वन विभागाने दिले होते. त्यामुळे सोमवारी पाषाण परिसरात आढळून आलेल्या गव्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. नागरिकांना गव्यापासून दूरवर थांबविण्यात यश आले होते. मात्र, गव्याने कंपनीजवळील जंगल परिसरात धूम ठोकल्याने शोधकार्यात अडथळा आला आहे.

रानगवा रस्त्याने पळाल्याने वाहतूककोंडी
रानगवा रस्त्याने पळू लागल्यामुळे अपघाताची शक्यता लक्षात पोलिसांनी वाहतूक थांबविली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. दूरवर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. मात्र, काही वेळानंतर वाहतूक पुर्ववत सुरू करण्यात आली.

रानगव्याला जंगलात पकडण्याचे प्रयत्न
रानगव्याला पकडण्यासाठी ट्रँग्युलाइजचा वापर केला जात नाही. तो शांत असल्यामुळे त्याला जंगलात पकडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. दरम्यान, कोथरूड परिसरात आढळून आलेल्या रानटी गवा पळाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर त्याला ट्रँग्युलाइजचा वापर करून पकडण्यात आले. मात्र, त्यानंतर काहीवेळाने त्याचा मृत्यू झाला होता.

ट्रँग्युलाइज इंजेक्शनचा वापर न करता जंगलामध्ये रानगव्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. मागील वेळेच्या तुलनेत रानगवा पकडण्याची परिस्थिती नियंत्रणात असून लोक सहकार्य करीत आहेत. पाषाण परिसरातील जंगलात आणखी काही रानगवे असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे.
-राहूल पाटील, उप-वनसंरक्षक, पुणे