नगरमध्ये शॉर्ट सर्कीटमुळे उसाला आग, लाखोंचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरमध्ये विजेची तार तुटून सुमारे वीस ते पंचवीस एकर उभा ऊस जळून खाक झाला आहे. पाथर्डी तालुक्यात जांभळी येथे दुपारी साडेबारा एकच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वीज वितरण कंपनीची मुख्य 132 केव्ही होल्ड असलेली टॉवर लाईन वरील तार अचानक तुटून बॉम्ब फुटल्यासारखा मोठा स्फोट होऊन आवाज झाला आणि आगेने रुद्र रूप धारण केले. हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जांभळी येथील ऊस उत्पादक शेतकरी किसन महादेव आव्हाड, महादेव सुखदेव आव्हाड, नवनाथ नारायण आव्हाड,  भगवान निवृत्ती आव्हाड, राधकीसन  निवृत्ती आव्हाड,  दिलीप अश्रूबा आव्हाड यांच्या मालकीचा वीस ते पंचवीस एकर ऊसाचे क्षेत्र जाळून खाक झाले आहे.

एकरी 60 ते 70 टन ऊसाचे उत्पादन यातून मिळते. येत्या आठ दिवसानंतर हे सर्व ऊसाचे क्षेत्र तोडणीसाठी आले असतांना अशी घटना घडल्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.

या घटनेने शेतकऱ्यावर पुन्हा एक संकट ओढवले आहे. कधी दुष्काळ, तर कधी हवामानाचा फटका बसून शेतीतील पीक शेतकऱ्यांच्या हाताशी लागत नाही. अनेक अडचणींवर मात करून मोठ्या कष्टाने शेतीत घाम गाळून बळीराजा शेत माल पिकवतो असे संकट आल्यावर तो हताश होतो.

त्वरित नुकसानभरपाई या संबधित शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी माजी पंचायत समितीचे सदस्य भगवान आव्हाड, आपचे किसन आव्हाड,तुकाराम आव्हाड ,राजू आव्हाड,नवनाथ आव्हाड यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.