
गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या पुनर्रचना प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीचे कलादालन उभे करण्यात येणार आहे. या कलादालनाचे सादरीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले असता मराठी रंगभूमीच्या वैभवाला साजेसे आणि भव्य असे कलादालन उभारा. यासाठी प्रकल्प आराखडा तयार करून वेगाने कार्यवाही करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी कलादालनासंदर्भातील बैठक आज पार पडली. या बैठकीला पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलादालनाची उभारणी करताना त्यात नावीन्यपूर्ण अशा बाबींचा समावेश करण्यात यावा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, कलादालनाचा परिपूर्ण प्रकल्प आराखडा सादर करण्यात यावा असे निर्देश दिले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवर उभारण्यात येणाऱया या कलादालनाची इमारतदेखील देखणी आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बैठकीत मराठी रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखविणाऱया कलादालनाची इमारत, बाह्य व अंतर्गत रचना यांसह विविध प्रकारच्या सुविधा याबबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह नाट्य व कला क्षेत्रातील शिवसेना सचिव, अभिनेते आदेश बांदेकर, अभिनेते सुबोध भावे, निर्माते विजय केंकरे आदी उपस्थित होते.






























































