चंद्रपूरच्या प्रदूषणात इथल्या वीज केंद्राचा मोठा वाटा आहे. यावर पर्यावरणवाद्यांकडून वारंवार ओरडही होत असते. याची थोडीशी दखल घेत वीज केंद्राने आता धूळरोधक मशिन्स वीज केंद्रातील कोळसा हाताळणी प्रकल्पात लावल्या आहेत. लगतच्या कोळसा खाणीतून कन्व्हेअर बेल्टच्या साह्याने जो कोळसा या केंद्रात आणला जातो, तो उतरवताना मोठी धूळ वातावरणात पसरत असते. ही कोळशाची धूळ आरोग्यास अतिशय घातक असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी वीज केंद्राने नवी उपाययोजना केली आहे.
वीज केंद्रात धूळरोधक दोन मशिन्स घेण्यात आल्या असून, त्या कोल हँडलिंग प्लांटमध्ये बसवण्यात आल्या आहेत. उतरवल्या जाणाऱ्या कोळशावर या मशिन्सद्वारे पाण्याचा फवारा मारला जातो. त्यामुळे धूळ वातावरणात पसरत नाही. प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.



























































