
दहा वर्षांपूर्वी गुन्हा करून तो कुटुंबासोबत फरार झाला. भिवंडीत त्याने संसार थाटला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो राजाचा मोहम्मद रियाज शेख बनला. आता काय पोलीस आपल्यापर्यंत पोहचत नाही अशाच विश्वाशात तो होता. पण नेहरू नगर पोलिसांनी इतक्या वर्षानंतरही धर्म आणि वेशभुषा बदलून राहणाऱया राजाच्या मुसक्या आवळल्या.
कुर्ला नेहरु नगर परिसरात राजा रामपुरे हा कुटुंबासोबत राहत होता. 2010 साली त्याने एका महिलेला बांबूने गंभीर मारहाण केली होती. त्यावेळी महिलेने दिलेल्या तक्रारारीवरून राजा विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पण तेव्हा त्याने कुर्ला सोडला. त्यामुळे गेली दहा वर्षे तो काही पोलिसांच्या हाती लागला नाही.
दरम्यान, 30 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांचे ऑल आऊट असताना नेहरु नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांना राजा रामपुरे याची माहिती मिळाली. तो भिवंडीत राहत असल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील तसेच अमंलदार राठोड, सोनवणे, डोंगरे, उगले या पथकाने तत्काळ राजाचा शोध सुरू केला.
पथक भिवंडीत धडकले व मिळालेल्या माहितीनुसार राजाच्या घरी गेले. तेव्हा तो उल्हासनगर येथे कामाला असून तेथेच राहत असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. मग अधिक चौकशीत राजाने धर्म बदलला असून तो आता मोहम्मद रियाज शेख झाल्याचे समजले. मग पोलिसांनी एका मध्यस्थाच्या मदतीने राजाला बोलावून घेत त्याला बेडया ठोकल्या.



























































