पालिका कर्मचाऱयांचा कोरोना भत्ता पुन्हा सुरू करा! म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेचे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱयांना मिळणारा रोजचा 300 रुपये कोरोना भत्ता पालिका प्रशासनाने पुन्हा सुरू करावा.  हा भत्ता मार्च 2021 पर्यंत सुरू ठेवण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते ते पाळावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. या मागणीला पालिकेतील सर्व कामगार संघटनांनी आणि समन्वय समितीने पाठिंबा दिला आहे.

कोरोनामुळे मुंबईत लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा, हॉटेल बंद होती. अशा स्थितीत पालिकेतील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. यात बहुतांशी कर्मचारी मुंबईबाहेरून येणारे होते. लॉकडाऊनमध्ये होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन कर्मचाऱयांना दररोज 300 रुपये कोरोना भत्ता दिला जात होता. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी लोकल सेवा सुरू झाली. त्यानंतर दुकाने आणि हॉटेल्सही सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे पालिका कर्मचाऱयांना देण्यात येणारा 300  भत्ता बंद करण्याचा निर्णय घेत तसे पत्रक पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने या आठवडय़ात काढले. पालिकेच्या या निर्णयाला पालिकेतील सर्व कामगार संघटनांनी विरोध केला आहे.

पालिका प्रशासनाने आश्वासन पाळावे!

पालिकेने कर्मचाऱयांना कोरोना भत्ता 23 मार्च 2020 पासून सुरु केला. हा भत्ता मार्च 2021 देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता, मात्र आश्वासन दिल्याप्रमाणे हा भत्ता सुरू ठेवण्याऐवजी बंद कर करण्यात आला आहे. पालिकेचे कर्मचारी स्वतः चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहेत. त्यामुळे पालिकेच्या कायम आणि कंत्राटी कर्मचाऱयांना मार्च 2021 पर्यंत कोरोना भत्ता सुरू ठेवावा आणि दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी केली आहे.