
पूरमुक्त मुंबईसाठी मिनी पंपिंग स्टेशन आणि पाण्याच्या निचऱयाचे नियोजन, कचऱयाचे प्रमाण कमी करण्यासाठी योजना, कॉमन तिकीट, लटकणाऱया ओव्हरहेड वायर काढून टाकणे आणि मुंबईची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी शहराच्या सीमेवर बस थांबवून ‘बेस्ट’, मेट्रोने प्रवाशांना वाहतुकीची सेवा देण्यासह ट्रान्सपोर्ट हब तयार करून वाहतूककोंडीतून सुटका करण्याचे ‘स्वच्छ, सुंदर, आनंदी मुंबई’चे महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन’ आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. आदित्य ठाकरे यांनी आज पालिकेत विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका घेऊन पालिकेच्या माध्यमातून सुरू असणाऱया आणि प्रस्तावित कामांचा आढावा घेतला.
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे अतिवृष्टी आणि समुद्राला भरती असताना अनेक भागांत पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. गेल्या काही वर्षांत मुंबईत होणाऱया अतिवृष्टीमुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे मुंबईची पाणी तुंबण्यातून सुटका करण्यासाठी पालिकेने प्रभावी नियोजन सुरू केले आहे.
यात पाणी तुंबणाऱया 386 ठिकाणांचा शोध घेण्यात आला असून इंजिनीयरच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत यातील जास्तीत जास्त ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार आहेत. हिंदमातासारख्या ठिकाणी विशेष नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशनचे काम लवकरच सुरू होणार आहे. माहुल पंपिंग स्टेशनच्या कामासाठी आपण स्वतः केंद्र सरकारकडे परवानगीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
या वेळी परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू आदी उपस्थित होते.
नामांतरावर मार्ग नक्कीच निघेल!
‘औरंगाबाद’च्या संभाजीनगर नामांतरावर लवकर आणि नक्कीच तोडगा निघेल असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपकडून नाहक टीका केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाच वर्षे सत्तेत असताना काही केले नाही आणि आता आरडाओरड सुरू आहे. भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन दिवसांत आपण संभाजीनगरच्या दौऱयावर जाणार असून या ठिकाणी सुरू असणाऱया विकासकामांचा आढावा घेणार असल्याचेही आदित्य त्यांनी सांगितले. कोविड आता चांगलाच नियंत्रणात आल्यामुळे मुंबईसह राज्यात विकासकामे वेगाने करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपला टीका करू द्या, आम्ही आमचे काम करीत राहणार, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या वेशीवर बेस्ट, मेट्रो सेवा!
मुंबईत दररोज हजारो बस येत असतात. मात्र या बसमधून कुटुंबकबिल्यासह आलेल्या प्रवाशांची अनेक वेळा प्रचंड गैरसोय होते. त्यांना फुटपाथवर, रस्त्यावर थांबावे लागते. शिवाय या बस शहरात कुठेही पार्किंग केल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. ही गैरसोय टाळण्यासाठी दहिसर चेक नाका, वाशी, मुलुंड आणि प्रस्तावित न्हावा शेवाच्या ठिकाणीच बाहेरून येणाऱया बस प्रवाशांसाठी ‘बेस्ट’, मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याबाबत काम करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. वाहतूक नियोजनासाठी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.
ओव्हरहेड वायर 15 दिवसांत काढणार
मुंबईत अनेक ठिकाणी लोंबणाऱया ओव्हरहेड वायर, केबलमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचते. त्यामुळे आगामी 15 दिवसांत ओव्हरहेड वायर काढून टाकण्याचे निर्देश दिल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली.
30 वर्षांचे नियोजन, दोन वर्षांत काम
स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त मुंबई बनवण्यासाठी आगामी 30 वर्षांचे नियोजन करण्यात येणार असून पुढील दोन वर्षांत याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यात पूरमुक्तीसाठी टोकिओच्या धर्तीवर भूमिगत टाक्या बांधून अतिवृष्टीत पाणी साठवणे आणि नंतर त्या पाण्याचा योग्य वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
असे होणार काम
नागरिकांना विनाअडथळा चालता यावे यासाठी रस्त्यांची सुधारणा, अतिक्रमण हटवणे, फुटपाथचे मजबुतीकरण, सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. पालिकेने 22 हजार सार्वजनिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्टय़ ठेवले असून यातील 7 हजार शौचालये बांधण्यात आली आहेत.
कचऱयाचे योग्य नियोजन करणे, समुद्र किनाऱयावर पवन ऊर्जेची निर्मिती करणे, मुंबईतील आस्थापने, कार्यालये, शाळा, कॉलेज, कंपन्या, मोठय़ा सोसायटय़ा आणि शक्य त्या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यावर भर देण्यात येणार आहे.
प्रत्येक प्रभागाचे काम दर्जेदार होण्यासाठी स्पर्धा आयोजित करून प्रोत्साहन देणे आणि चांगले काम होणाऱया विभागांचा पालिकेच्या माध्यमातून गौरव करणे असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबईचा विकास करून राज्यभरात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मुंबईचा पाणीपुरवठा वाढवण्यासाठी गारगाई, पिंजाळ प्रकल्प प्रस्तावित असून समुद्राचे पाणी प्रक्रिया करून वापरण्याचे नियोजनही वेगात सुरू आहे.























































