
साताराच्या पाटण तालुक्यातील शेडगेवाडी- विहेमध्ये बिबट्याने तरुणावर केलेल्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. जेवण करून शतपावली करण्यास गेलेल्या तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला केला. ऋषिकेश अरविंद थोरात (वय 20, रा. शेडगेवाडी) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भोळेवाडी -विहे दरम्यान असलेल्या शेडगेवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेजवळ काही तरुण जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी गेले होते. यावेळी रस्त्याने चालत असताना अचानक त्यांच्यासमोर बिबट्या आला. यामुळे शतपावली करणारे तरुण गोंधळले. त्याचवेळी बिबट्याने ऋषीकेशवर हल्ला केला. त्यात त्याच्या मांडीला व हाताला बिबट्याने ओरबडल्याने जखम झाली आहे. ऋषिकेश आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणांना आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनक्षेत्रपाल विलास काळे दाखल झाले होते. भरवस्तीत बिबट्याने तरुणावर हल्ला केल्यामुळे शेडगेवाडी, विहे, भोळेवाडी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



























































